पती आणि दोन वर्षाच्या मुलासमोर विवाहित महिलेची गोळी झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 06:30 PM2017-10-25T18:30:23+5:302017-10-25T18:53:12+5:30
प्रिया मेहरा असे मृत महिलेचे नाव आहे. गोळीबार झाला त्यावेळी प्रियासोबत पती पंकज आणि दोनवर्षांचा मुलगा होता.
नवी दिल्ली - दिल्लीच्या शालिमार बाग परिसरात विवाहित महिलेची तिच्या दोन वर्षांच्या मुलासमोर गोळया झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. प्रिया मेहरा असे मृत महिलेचे नाव आहे. गोळीबार झाला त्यावेळी प्रियासोबत पती पंकज आणि दोनवर्षांचा मुलगा होता. हे कुटुंब गुरुद्वारामध्ये दर्शन घेऊन गाडीने घरी परतत असताना शालिमार बाग भागात त्यांच्यावर गोळीबार झाला.
मेहरा कुटुंबियांची गाडी शालिमार बाग भागामध्ये असताना वेगात एक गाडी ओव्हरटेक करुन त्यांच्यापुढे जाऊन थांबली. या गाडीतून हल्लेखोर उतरले व त्यांनी थेट मेहरा कुटुंबावर गोळीबार सुरु केला. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळयांनी प्रियाच्या शरीराचा वेध घेतला. सुदैवाने पंकज आणि त्यांचा दोनवर्षांचा मुलगा या गोळीबारातून बचावला. प्रियाचे पती तिला लगेच नजीकच्या रुग्णालयात घेऊन गेले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
गंभीर जखमी झालेल्या प्रियाकडे पोलीस आणि रुग्णालयाने दुर्लक्ष केले असा आरोप मेहरा कुटुंबाने केला आहे. प्रियाला रुग्णालयात आणले त्यावेळी सुरुवातीला डॉक्टरांनी उपचार करायला नकार दिला. पोलीस आल्यावरच आम्ही उपचार सुरु करु असे रुग्णालयाने सांगितले असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्याचवेळी हद्दीच्या मुद्यावरुन पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते त्यामुळे उपचाराला आणखी विलंब लागला. दिल्लीत गुन्हेगारी मोठया प्रमाणावर वाढली असून, मागच्या तीन दिवसात पाच हत्या झाल्या आहेत. प्रिया मेहरा गृहिणी होती. पती पकंज यांचा पहाडगंज भागात बिझनेस आहे.