मी पुन्हा मुख्यमंत्री होणार- सिद्धरामय्यांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:33 PM2018-08-25T12:33:55+5:302018-08-25T12:35:02+5:30
लोक मला आशीर्वाद देतील आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईन असं वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने माझा पराभव झाला. पण हा शेवट नाही.
बंगळुरु- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्रीसिद्धरामय्या आणि सध्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यामध्ये सारंकाही आलबेल नाही हे आतापर्यंत अनेकदा समोर आलं आहे. अर्थसंकल्प असो वा राज्यातील प्रकल्प प्रत्येक बाबतीत सिद्धरामय्या यांनी जनता दल सेक्युलरपेक्षा वेगळं मत मांडलं आहे. कर्नाटकातील सरकार किती वर्षे चालेल याबाबत आधीपासून शंका व्यक्त होत असल्या तरी आता सिद्धरामय्या यांनी आपण मुख्यमंत्री होणार असा थेट विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे कर्नाटकात पुन्हा नव्या घडामोडी होणार का याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
हसनमध्ये एका सभेत बोलताना सिद्धरामय्या यांनी आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असे सांगितले. राजकारणात जय-पराजय होत असतोच. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने मी परत एकदा मुख्यमंत्री होणार. मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून विरोधी पक्षांनी एकत्र प्रयत्न केले. राजकारणामध्ये जाती आणि धनशक्तीचे प्राबल्य वाढत आहे.
सिद्धरामय्या पुढे म्हणाले,' लोक मला आशीर्वाद देतील आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईन असं वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने माझा पराभव झाला. पण हा शेवट नाही. राजकारणात जय-पराजय या सामान्य बाबी आहेत.'
याच महिन्यात फिल्म सिटीचा प्रकल्प रामनगर येथे स्थापन केला जाऊ नये असे सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामींना पत्र लिहिले होते. सिद्धरामय्या यांनी गेल्या दोन महिन्यात मुख्यमंत्र्यांना लिहिलेले हे पाचवे पत्र आहे. सिद्धरामय्या गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीही होते. गेल्या सरकारचे शेवटचे बजेट सादर करताना त्यांनी म्हैसुर येथे फिल्मसिटी स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र सध्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी हा निर्णय बदलून फिल्म सिटी रामनगर येथे नेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दलच सिद्धरामय्या यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. कुमारस्वामींनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी केली होती.