ICSE 10th ,12th Results: आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर; मुंबईची जुही कजारिया देशात पहिली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 03:49 PM2019-05-07T15:49:32+5:302019-05-07T16:09:31+5:30
यंदाच्या परिक्षेतही मुलींची बाजी
मुंबई: सीबीएसईपाठोपाठ आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. यातही मुलींनी बाजी मारली आहे. आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत 98.54 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर बारावीचा निकाल 96.52 टक्के इतका लागला आहे. आज दुपारी तीन वाजता आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे निकाल जाहीर झाले.
यंदा आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या निकालाच्या टक्केवारीत किंचित सुधारणा झाली आहे. दहावीच्या निकालाच्या टक्क्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.03 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर बारावीच्या निकालात 0.31 टक्क्यांची वाढ झाली आहे. आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत मुंबईच्या जमनाबाई नर्सी शाळेची जुही कजारिया 99.60 टक्क्यांसह देशात पहिली आली आहे. तर मुंबईचे फोरम संजनवाला आणि अनुश्री चौधरी, अनुष्का अग्निहोत्री आणि ठाण्याचा यश भन्साळी देशात संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 99.40% मिळाले आहेत. नागपूरच्या चंदादेवी सराफ शाळेचा श्रीनाथ अगरवाल, गोरेगावच्या विबग्योर हायस्कूलचा झरवान श्रॉफ, जुहूच्या जमनाबाई नर्सी शाळेचा जुगल पटेल, ठाण्याच्या सिंघानिया हायस्कूलचा ओजस देशपांडे देशात तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांना 99.20 टक्के गुण मिळाले आहेत.
बारावीच्या परीक्षेत कोलकात्याचा देवांग कुमार अगरवाल आणि बंगळुरुची विभा स्वामीनाथन यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. या दोघांनाही 100 टक्के गुण मिळाले आहेत. आयसीएसईच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवण्याची कामगिरी याआधी कोणालाही करता आली नव्हती.