भारताने नैतिक शिक्षण आणि तत्वांना धरुन वाटचाल केली, तर चीनदेखील मागोमाग येईल - दलाई लामा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 03:15 PM2017-12-07T15:15:30+5:302017-12-07T20:09:49+5:30
भारताने आपल्या तत्वांवर आधारिक नैतिक शिक्षणावर जोर दिला तर चीनदेखील भारताच्या पावलांवर पाऊल ठेवत आपली वाटचाल करेल असं तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली - भारताने आपल्या तत्वांवर आधारिक नैतिक शिक्षणावर जोर दिला तर चीनदेखील भारताच्या पावलांवर पाऊल ठेवत आपली वाटचाल करेल असं तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांनी म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी युद्ध आणि शस्त्रांचा वापर गरजेचा नसून करुणा आणि शिक्षणावर जोर देणं गरजेचं असल्याचं सांगितलं. तिबेटवर सध्या राजकीयदृष्या जरी चीनने कब्जा केला असला, तरी एक दिवस तिबेट चीनवर राज्य करेल अशी भविष्यवाणीही दलाई लामा यांनी केली आहे. काही दिवसांपुर्वी दलाई लामांनी तिबेटच्या स्वातंत्र्याची नाही, तर विकासाची अपेक्षा असल्याचं सांगितलं होतं.
दलाई लामांनी सांगितलं की, 'युद्धासारख्या समस्यांमधून उपाय शोधणं बेईमानी असून ही खूप जुनी पद्धत आहे. करुणा आणि शिक्षणाचा प्रसार झाल्यानंतरच हे जग एक सुंदर ठिकाण बनू शकतं'. भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीची तुलना करताना ते बोलले की, 'शिक्षण आजच्या काळात महत्वाची गोष्ट असून भारतासाठी ही काही नवी गोष्ट नाही. भारतामध्ये अहिंसेचे विचार 1000 वर्ष जुने आहेत'.
'मला असं वाटतं आधुनिक भारत खूप शांततापुर्ण आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारतातील स्थिती खूप चांगली आहे. पाकिस्तान एक मुस्लिम देश असून भारतात पाकिस्तानच्या तुलनेत अधिक मुस्लिम राहतात. दोन्ही देशातील मुस्लिम एकच कुराण वाचतात. पण भारतातील मुस्लिम जास्त शांतताप्रिय आहेत. यामुळेच भारतात अनेक वर्षांपासून चालत आलेली अहिंसेची परंपरा अद्याप कायम आहे', असं दलाई लामा म्हणाले आहेत.
भारतीय परंपरापासून प्रभावित झाल्याचं सांगतना दलाई लामा यांनी युद्ध आणि शस्त्रांच्या वापराने जगात फक्त छोटे युद्ध जिंकले जाऊ शकतात असं म्हटलं आहे. 'शस्त्रांचा वापर करत सत्तेपर्यंत नक्कीच पोहोचता येऊ शकतं, पण मोठ्या शर्यतीत हे कामाला येत नाही', हे सांगायला ते विसरले नाहीत.
'भारतातील प्राचीन शिक्षापद्दतीमुले मला दृढ इच्छाशक्ती मिळाली. भारतीय संस्कृतीत समाधी आणि मौनची प्रथा तीन हजार वर्ष जुनी आहे. भारतीय संस्कृती वारंवार भावनांवर नियंत्रण आणि मानसिक स्तरावर सुधारणा करण्याबद्दल सांगते', असं दलाई लामा म्हणाले आहेत. 'बौद्ध धर्म अहिंसेचा धर्म आहे. यामध्ये हिंसा, युद्धाला कोणतंही स्थान नाही. भारतीय परंपरा आणि शिक्षणाचा प्रचार केल्यास जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते', असा विश्वास दलाई लामांनी व्यक्त केला.