लग्नाची नोंदणी न केल्यास भरावा लागणार दंड?
By admin | Published: July 4, 2017 08:52 PM2017-07-04T20:52:38+5:302017-07-04T21:33:26+5:30
ब-याचदा विवाह झाल्यानंतर त्याची नोंदणी करण्यासाठी आपण टाळाटाळ करतो.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - ब-याचदा विवाह झाल्यानंतर त्याची नोंदणी करण्यासाठी आपण टाळाटाळ करतो. खरं तर नियमानुसार 30 दिवसांच्या आत लग्नाची नोंदणी करणं आवश्यक असतं. या नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जात नाही. मात्र आता तुम्हाला विवाह नोंदणी करण्याशिवाय गत्यंतर नाही. लग्न झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत विवाह नोंदणी करणे लवकरच बंधनकारक करण्यात येणार असून, या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच विवाह नोंदणी करण्यास टाळाटाळ करणा-यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.
कायदा आयोगाने याबाबत केंद्र सरकारला दिलेल्या अहवालामध्ये विवाह नोंदणी बंधनकारक करण्याची मागणी केलीय. त्याप्रमाणेच कोणत्याही ठोस कारणांशिवाय विवाह नोंदणीमध्ये उशीर झाला, तर प्रतिदिन 5 रुपये दंड आकारला जाण्याचीही शक्यता आहे. रिपोर्टनुसार वेळेत विवाह नोंदणी न केल्यास प्रतिदिन कमीत कमी 5 रुपये आणि जास्तीत जास्त 100 रुपये दंड आकारण्याचं प्रस्तावित आहे. विवाह नोंदणी बंधनकारक केल्यानं जबरदस्ती होणारे विवाह आणि बालविवाह रोखण्यासाठी मदत होणार असल्याचाही कायदा आयोगाचा कयास आहे. त्याप्रमाणेच लैंगिक समानता आणि महिलांच्या सशक्तीकरणाला मदत मिळणार असल्याचंही कायदा आयोगानं स्पष्ट केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 2006मध्ये दिलेल्या आदेशात विवाह नोंदणी बंधनकारक केली होती. या निर्णयाची काही राज्यांनी अंमलबजावणीसुद्धा केली होती. मात्र काही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय गांभीर्यानं घेतला नाही. न्यायालयाच्या निर्णयाला गांभीर्याने न घेतल्याने कायदा आयोगाने केंद्र सरकारला विवाह नोंदणी बंधनकारक करण्याची मागणी केली आहे.