सिडनीची पुनरावृत्ती रोखायची असल्यास अन्य धर्मीयांना हिंदू बनवा - निलेश राणे
By admin | Published: December 17, 2014 11:31 AM2014-12-17T11:31:44+5:302014-12-17T14:28:09+5:30
सिडनीतील दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती रोखायची असल्यास अधिकाधिक लोकांचे धर्मांतर करून त्यांना हिंदू धर्मात आणा' असे वादग्रस्त ट्विट काँग्रेस नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - सिडनीतील कॅफेमधील ओलीस नाट्य यामुळे संपूर्ण जगाचा थरकाप उडालेला असतानाच 'सिडनीतील दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती रोखायची असेल तर भारतातील अधिकाधिक लोकांचे धर्मांतर करून त्यांना हिंदू धर्मात आणायला हवे' असे ट्विट काँग्रेस नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे. मात्र हे आपले वैयक्तिक मत आहे पक्षाची भूमिका नव्हे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आग्र्यातील कथित धर्मांतराच्या मुद्यावरून सध्या देशभरात गदारोळ माजलेला असतानाचा राणे यांच्या या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
'ऑस्ट्रेलियात हल्ल्याची जी घटना घडली ती जगभरात सर्वत्र घडताना दिसत असून त्याची पुनरावृत्ती रोखायची असल्यास अधिकाधिक लोकांना हिंदू धर्मात आणण्याचा कार्यक्रम भारताने हाती घ्यायला हवा' असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तीन दिवसांपूर्वी सिडनीत रंगलेल्या ओलीस नाट्यात एका दहशतवाद्यासह दोन निष्पाप नागरिकही ठार झाले होते.
एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना राणे यांनी उत्तर प्रदेशमधील सामूहिक धर्मांतराचे समर्थनच केले आहे. ' गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये जे घडत आहे, त्यात काहीच चुकीचे नाही. बंदुकीच्या धाकावर धर्मपरिवर्तन करणे चुकीचे अाहे, परंतु जर धर्मांतर करून हिंदू धर्मात स्वेच्छेने अन्य धर्मीय येत असतील तर त्यांना प्रवेश देण्यात यावा, त्यात काही गैर नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ' अन्य कोणत्याही धर्मापेक्षा हिंदू धर्म दहशतवादाचा सामना सामना अधिक मजबुतीने करू शकतो. मी एका हिंदू कुटुंबात जन्माला आलो आहे. हिंदूंच्या भल्यासाठीच मी हे विचार मांडत आहे. एखाद्या हिंदूने दुस-या व्यक्तीवर हल्ला केल्याचे मी आत्तापर्यंत कधीच ऐकलेले नाही. मी कोणत्याही जाती- धर्माच्या विरोधात नाहीये, पण सर्व हिंदू जर एकत्र आले तर दहशतवाद्यांना कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी अनेकवेळा विचार करावा लागेल,' असेही निलेश यांनी म्हटले आहे.
दरम्यान पेशावरमधील शाळेतील हल्ल्याचा त्यांनी जोरदार निषेध करत तालिबानाचा समूळ नायनाट करण्याची वेळ आली आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.