राहुल गांधींना भेटायचंच असतं तर सर्वांसमोर घेतली असती भेट -हार्दिक पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 08:44 AM2017-10-24T08:44:15+5:302017-10-24T08:46:20+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्यात अहमदाबादमधील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
अहमदाबाद - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्यात अहमदाबादमधील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून या बैठकीच्या वृत्ताचे खंडन करण्यात येत आहे. हार्दिक पटेलनंही हे वृत्त फेटाळून लावले आहे. यावर हार्दिकनं असे म्हटले आहे की, ''जर राहुल गांधींसोबत हातमिळवणी करायची असल्यास त्यांची सर्वांसमोर भेट घेईन. राहुल गांधींची लपून-छपून का भेट घेऊ ?''. तर दुसरीकडे, यापूर्वी असे वृत्त समोर आले होते की, सोमवारी ( 23 ऑक्टोबर ) सकाळी राहुल गांधी गांधीनगरमध्ये सभा घेण्यापूर्वी हार्दिक पटेलची भेट घेणार आहेत.
अहमदाबादमध्ये राहुल गांधी वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये हार्दिक पटेल आणि त्याचे सहकारी जातानाची सीसीटीव्ही चित्रफीत टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने प्रसारित केली होती. त्याच हॉटेलमधील एका खोलीत राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. सध्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने दोघांमध्ये निवडणुकीसंदर्भातच चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रविवारी रात्री 11.53 वाजल्यापासून ते सोमवारी संध्याकाळी 4.14 वाजेपर्यंतच्या 5 व्हिडीओ क्लिपमध्ये हार्दिक पटेल हॉटेलमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर येताना दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकनं राहुल गांधींव्यतिरिक्त सोमवारीच भाजपाला सोडचिठ्ठी दिलेल्या निखिल सवानी, अशोक गहलोत आणि गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष भारतसिन सोलंकीचीही भेट घेतली. दरम्यान, हार्दिक पटेलला या सीसीटीव्ही फुटेजसंदर्भात विचारणा केली असता त्यानं सांगितले की, मी राहुल गांधींची भेट घेतलेली नाही. मात्र अशोक गहलोत आणि गुजरात काँग्रेसचे अध्यक्षांसोबत पाटीदार समुदायाला प्रभावित करणा-या मुद्यांवर चर्चा केली.
तर दुसरीकडे, हार्दिक पटेलच्या सहकाऱ्यांची फोडाफोडी करणाऱ्या भाजपाला सोमवारी डबल झटका बसला होता. नरेंद्र पटेल यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर निखिल सवानी यांनीही भाजपाची साथ सोडली. सोमवारी सकाळी निखिल सवानी यांनी पत्रकारांशी बातचीत करताना भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केले होते. मला फक्त लॉलिपॉप ऑफर केला जात असून, आश्वासन पूर्ण केलं जात नसल्याने राजीनामा देत असल्याचे निखिल सवानी बोलले. विशेष म्हणजे नरेंद्र पटेल यांच्याप्रमाणेच निखिल सवानी हेसुद्धा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याचे निकटवर्तीय आहेत.
निखिल सवानी यांच्याआधी नरेंद्र पटेल यांनी भाजपाला रामराम ठोकला होता. यावेळी नरेंद्र पटेल यांनी गौप्यस्फोट करत भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा खळबळजनक खुलासा केला. ''यातील 10 लाख रुपयांची रक्कम पक्षप्रवेशासाठी सुरुवातीलाच देण्यात आली. उर्वरित 90 लाख रुपये सोमवारी (23 ऑक्टोबर) देण्यात येणार होते'', असा खळबळजनक आरोप नरेंद्र पटेल यांनी केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपाला घरचा अहेर दिला. मात्र निखिल सवान यांनी आपल्याला पैशांची ऑफर देण्यात आली नव्हती असं स्पष्ट केलं आहे.