वाढता मानवी हस्तक्षेप सारिस्का-रणथंबोरच्या मुळावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 05:34 AM2019-02-14T05:34:44+5:302019-02-14T05:34:58+5:30
वाढती लोकसंख्या आणि देवीची जत्रा यामुळे सारिस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढविण्यात अडचणी येत आहेत. रणथंबोर अभयारण्यातली व्याघ्रसंख्या झपाट्याने वाढली असून तेथील वाघांना स्थलांतरित करावे लागणार आहे.
- राजू नायक
सारिस्का (राजस्थान) : वाढती लोकसंख्या आणि देवीची जत्रा यामुळे सारिस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढविण्यात अडचणी येत आहेत. रणथंबोर अभयारण्यातली व्याघ्रसंख्या झपाट्याने वाढली असून तेथील वाघांना स्थलांतरित करावे लागणार आहे. मात्र, पर्यटन लॉबीच्या दबावामुळे हे स्थलांतर अडले आहे.
‘सारिस्का व रणथंबोर ही दोन्ही अभयारण्ये एकमेकांना निकट असल्यामुळे वाघांचे स्थलांतर करण्यात नैसर्गिक अडचणी नाहीत,’ अशी माहिती डेहराडून येथील ‘भारतीय वन्यजीव संस्थान’च्या
प्राणी पर्यावरण आणि संवर्धन जीवशास्त्र विभागाचे प्रमुख यादवेंद्र झाला यांनी ‘लोकमत’ला
दिली.
हा प्रकल्प आता ६ बछड्यांसह १९ वाघांचे निवासस्थान बनला आहे. २००५ मध्ये सारिस्का अभयारण्यातून ४ वाघ नाहीसे झाल्यानंतर भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली होती. मात्र, त्यानंतर २००८ साली रणथंबोरमधून वाघांच्या दोन जोड्या स्थलांतरित करण्यात आल्या. आणखी दोन वर्षांनतर वाघांच्या २ मादी येथे सोडण्यात आल्या. सध्या येथील वाघांची संख्या १९ आहे. तरीही गेल्या वर्षभरात येथे ३ वाघांचा झालेला मृत्यू ही वनाधिकाऱ्यांच्या चिंतेची बाब बनली आहे.
यादवेंद्र झाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिस्कामध्ये दर मंगळवारी व शनिवारी उत्सवासाठी १००हून अधिक वाहने येत असतात. धार्मिक कारणांमुळे त्यांच्या संख्येवर निर्बंध लादणे शक्य होत नाही. शिवाय दररोज पर्यटकांच्या किमान ३० जीप्स येथे येत असतात.
मात्र, स्थानिकांचा हस्तक्षेप, भाविकांच्या भोजनावळी आणि वाढत चाललेल्या मानवी वस्त्या या अभयारण्याच्या प्रमुख समस्या
बनल्या आहेत. सारिस्कातून या
आधी दोन वेळा मानवी वस्त्या हटविण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्यावर होणारा खर्च ही योजना आणखीन वेगाने राबविण्यात अडचणी निर्माण करतो.
अपुरे सुरक्षा कर्मचारी
सारिस्काचे क्षेत्रफळ पाहाता, येथे किमान ४०० सुरक्षाकर्मींची आवश्यकता आहे. परंतु, प्रत्यक्षात येथे १४० सुरक्षा रक्षकांना मंजुरी मिळाली असून त्यातील जेमतेम १००जण कामावर असतात. वाघांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या गळ्यात जी कॉलर बसविण्यात येते ती जर्मनीतून साडेतीन लाख रुपये मूल्य देऊन आयात करावी लागते. ती चार वर्षे चालते. देशभरात एकूण ३० वाघांना अशा प्रकारची कॉलर बसविण्यात आली आहे. रणथंबोरमध्ये वाघांच्या वाढलेल्या संख्येने समस्या निर्माण केल्या आहेत. या उद्यानाचा विस्तार ३९२ चौ. किमी.मध्ये असून त्याचे बफर क्षेत्र १३४२ चौ. किमी. आहे. मात्र, प्रत्यक्षात इथल्या वाघांचा वावर ६०० चौ. किमी. क्षेत्रात असतो. १९८२ साली येथे ४४ वाघ होते. २०१९ मध्ये ती संख्या ७४वर गेलेली आहे. वाढत्या संख्येमुळे वाघ मानवी वस्तीत शिरकाव करीत आहेत.