Independence Day 2017 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 10 मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 09:23 AM2017-08-15T09:23:54+5:302017-08-15T09:24:44+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन चौथ्यांदा भाषण केले आहे.
नवी दिल्ली, दि. 15 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन चौथ्यांदा भाषण केले आहे. त्यांच्या भाषणातील काही महत्त्वाच्या मुद्यांवर एक नजर टाकूया
1. एप्रिल ते 5 ऑगस्ट 2017पर्यंत 56 लाख नवीन लोकांना कर परतावा दाखल केला असून वर्षभरापूर्वी ही संख्या 22 लाख एवढी होती. कधीच आयकर भरला नव्हता अशा 1 लाख लोकांनी कर भरला. तीन वर्षात सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा बाहेर काढला. नोटाबंदीनंतर 3 लाख कोटी रुपये बँकिंग व्यवस्थेत आले. नोटाबंदीनंतर हवाल्याचं काम करणाऱ्या 3 लाख कंपन्या सापडल्या. यातील पावणे दोन लाख कंपन्या रद्द केल्या आहेत.
2. टीम इंडियाच्या न्यू इंडिया संकल्पाची हीच योग्य वेळ आहे. आपण सर्वांना मिळून असे भारत घडवायचा आहे की जेथे गरीबांकडे घर, वीज आणि पाणी उपलब्ध असेल. एक असा भारत घडवू जेथे देशातील शेतकरी चिंतेची नाहीतर शांततेची झोप घेईल. आज शेतकरी जेवढं कमवत आहे, त्याहून दुप्पट कमवेल. तरुणवर्ग आणि महिलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर संधी मिळेल. असा भारत निर्माण करुन जो दहशतवाद, सांप्रदायिकता आणि जातीयवादापासून मुक्त असेल.
3. आस्थेच्या नावावर या देशात हिंसा खपवून घेतली जाणार नाही. हिंसेला देश कधीही स्वीकारणार नाही. स्वातंत्र्यापूर्वी भारत छोडोचा नारा होता आता भारत जोडोचा नारा आहे. देशाच्या गौरवासाठी ज्या-ज्या लोकांनी त्याग केला आहे, यातना-दुःख सहन केले आहे त्या सर्वांना नमन.
4.कधी-कधी नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात. देशातील काही भागांत गेल्या काही दिवसांत नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. हॉस्पिटलमध्ये निष्पाप मुलांचा मृत्यू झाला आहे,असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर प्रकरणाबाबत खेद व्यक्त केला.शिवाय देशाच्या सुरक्षेसाठी काहीही करण्यास आम्ही कमी पडणार नाही, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
5. स्वातंत्र्य भारतासाठी हे विशेष वर्ष आहे. यंदा ऐतिहासिक चंपारण्य सत्याग्रहाचे 100 वे वर्ष आपण साजरे करत आहोत. भारत छोडो आंदोलनाचे हे 75 वे वर्ष आहे. बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली होती त्याचेही यंदा 125 वे वर्ष आहे.
6.1942-1947दरम्यान देशानं सामूहिक शक्ती प्रदर्शन केले. पुढील 5 वर्ष याच सामूहिक शक्ती बांधिलकी व मेहनतीसोबत देशाला पुढे न्यायचे आहे.
7. सामूहिक शक्ती, एकीचं बळ ही आपली ताकद आहे. देशात कुणी छोटा नाही, कुणी मोठा नाही, सर्व समान आहे. सामूहिक शक्तीमुळे देश स्वतंत्र झाला, एकीचे महत्त्व सर्वांना माहित आहे. न्यू इंडियाचा संकल्प घेऊन पुढे जायचे आहे. न्यू इंडिया सामर्थ्यशाली, सुरक्षित आणि जगभरात भारताचा दबदबा असणारा असा असेल.
8. 21 व्या शतकात जन्म घेणाऱ्यांसाठी 2018 हे वर्ष निर्णायक असेल. युवकांनो देशाच्या विकासात योगदान द्या, देश तुम्हाला निमंत्रित करतोय. चालतंय, चालू द्या, हा जमाना गेला, आता बदल होतोय, बदलत आहेचा जमाना आला आहे.
9. आज देशात इमानदारीचा उत्सव साजरा होत आहे. ज्यांनी देशाला लुटलं आणि गरिबांना लुटलं त्यांची आज झोप उडाली आहे. अप्रमाणिक लोकांना तोंड लपवायला जागा मिळत नाहीय. जेव्हा सर्जिकल स्टाईक केले तेव्हा भारताची ताकद सर्वांनी मान्य केली.
10. आपण 9 महिन्यात मंगळावर यान पाठवतो, पण 42 वर्षांपासून एक प्रकल्प अडकलेला होता. केंद्र सरकारानं प्रकल्पांची अंमलबजावणी व्हावी यावर लक्ष केंद्रीत केले आहे. सरकारच्या कोणत्याही योजनेस विलंब होतो तेव्हा सर्वाधिक नुकसान गरीब परिवारांचं होते. सरकारच्या कार्याचा तपशील प्रत्येक महिन्यात घेत असतो.