#IndependenceDay - मोदींनी केलं आतापर्यंतचं सर्वात छोटं भाषण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 10:36 AM2017-08-15T10:36:33+5:302017-08-15T10:40:45+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी 54 मिनिटं भाषण केलं
नवी दिल्ली, दि. 15 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन सलग चौथ्यांदा देशवासियांनी संबोधित केले. मोदींनी यावेळी केलेलं भाषण चार वर्षातील सर्वात छोटं भाषण होतं. पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात' मध्ये बोलताना स्वातंत्र्यदिनाची भाषणं खूप मोठी असल्याची तक्रार करणारी पत्रं मिळाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर जुलै महिन्यात 'मन की बात'मध्ये बोलताना यावेळी स्वातंत्र्यदिनी होणारं भाषण छोटं असेल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्यानुसार मोदींनी थोडक्यात भाषण आटोपतं घेतलं.
आणखी वाचा
दिव्यांगांसह, सर्वांना एकत्र आणणारे लोकमत व त्रिनयनी प्रस्तुत राष्ट्रगीत
नवीन भारताचा संकल्प 2022 पर्यंत पूर्ण करायचा आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी 54 मिनिटं भाषण केलं. 2014 मध्ये पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतरच हे त्यांचं सर्वात छोटं भाषण होतं. 2014 मध्ये 65 मिनिटं, 2015 मध्ये 86 मिनिटं आणि 2016 मध्ये 94 मिनिटांचं भाषण मोदींनी केलं होतं.
Jai Hind chants echo at the Ramparts of Red Fort. #IndependenceDayIndia . #स्वतंत्रतादिवसpic.twitter.com/o7l5Bps6Wm
— BJP (@BJP4India) August 15, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लाल किल्ल्यावरुन सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या या शुभप्रसंगी देशवासियांना कोटी-कोटी शुभेच्छा. संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचाही उत्सव साजरा करत आहे. सुदर्शन चक्राधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिलं, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वाकोटी देशवासियांतर्फे नमन करतो, असेही उद्गार यावेळी पंतप्रधान मोदींनी काढले.
विकासाच्या शर्यतीत आपण सर्व एकत्रितरित्या पुढे जाण्यासाठी काम करुया. जीएसटीमुळे देशाची कार्यक्षमता 30 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डिजिटल देवाण-घेवाणीत 34 टक्के वाढ झाली आहे. जीएसटीमुळे वेळेसोबतच हजारो कोटीही वाचले आहेत. देशाला ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र असे करत असताना गती कमी होऊ देणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले. हा देश बुद्धांचा आहे, गांधीचा आहे, येथे आस्थेच्या नावाखाली होणारा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कट्टरतावाद्यांना खडसावले आहे.
सरकारमध्ये डाळ खरेदी करण्याची प्रथा कधीच नव्हती,यावर्षी 16 लाख टन डाळ खरेदी केली. सरकारनं शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं आणि 16 लाख टन डाळ खरेदी करुन इतिहास रचला असंही मोदींनी सांगितलं आहे.