भारताने हिंदी महासागरात दाखवली 'गगन शक्ती'; चिनी ड्रॅगनला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 11:22 AM2018-04-23T11:22:49+5:302018-04-23T11:22:49+5:30
हिंदी महासागरात चीनकडून वारंवार मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. यावेळी हिंदी महासागरात हवाई दलानं लांब अंतरावरील क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.
नवी दिल्ली- हिंदी महासागरात चीनकडून वारंवार मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. यावेळी हिंदी महासागरात हवाई दलानं लांब अंतरावरील क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. चीन हिंदी महासागरात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय हवाई दलाला क्षेपणास्त्र परीक्षणात मिळालेलं यश हा चीनसाठी एक प्रकारचा इशाराच आहे.
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, गगन शक्तीच्या सरावामुळे चीनचं सैन्यही हवाई दलाच्या टप्प्यात आलं आहे. त्यामुळे हवाई दल जवळपास 2000 किलोमीटर अंतरावरच शत्रूंना पळवून लावू शकणार आहे. गगन शक्तीच्या या सरावात ब्रह्मोस आणि हार्पून अशा क्षेपणास्त्रांसह सुखोई आणि जग्वार सारख्या विमानांनी सहभाग नोंदवत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. हवाई दलाच्या मते, पश्चिमी आणि पूर्व दोन्ही समुद्रांच्या क्षेत्रात युद्धसराव सुरू आहे. दक्षिण भारतातल्या समुद्रात या सरावादरम्यान Su-30MKI कॉम्बेट प्लेनसह ब्रह्मोस क्रूज क्षेपणास्त्राचाही वापर करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या क्षेत्राजवळूनच चीनचे जवळपास 80 टक्के व्यापारी जहाज ये-जा करत असतात. हवाई दलाच्या सरावामुळे हे स्पष्ट झालं आहे की, हिंदी महासागरात भारत ही एक मोठी शक्ती आहे. गेल्या काही काळापासून चीन हिंदी महासागरात जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी भारतानं हा युद्धसराव केला आहे. गगन शक्तीचा सराव हा युद्धाभ्यासासारखाच आहे. ज्यात पूर्ण ताकदीनिशी उतरलं जातं. या सरावाच्या माध्यमातून हिंदी महासागरात चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या मैत्रीला भारतानं एक प्रकारे इशारा दिला आहे. चीन ज्या प्रकारे म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीवच्या हिंदी महासागरात सामर्थ्य वाढतो आहे, भारताकडूनही त्याच वेळी हा युद्धाभ्यास करण्यात आला आहे.