भारतात मोठ्या घातपाताचा ‘इसिस’चा कट होता
By admin | Published: March 24, 2016 02:00 AM2016-03-24T02:00:42+5:302016-03-24T02:00:42+5:30
भारतात मोठ्या घातपाताचा ‘इसिस’चा कट होता, पण संघटनेतील अंतर्गत मतभेदामुळे तो तडीस जाऊ शकला नाही, त्याचा फायदा भारताला झाला, असे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.
डिप्पी वांकाणी , मुंबई
भारतात मोठ्या घातपाताचा ‘इसिस’चा कट होता, पण संघटनेतील अंतर्गत मतभेदामुळे तो तडीस जाऊ शकला नाही, त्याचा फायदा भारताला झाला, असे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.
मुंब्रास्थित मुदब्बीर शेख याच्या अटकेतून ही माहिती उघडकीस आली आहे. शेख याने सांगितले की, भारतात घातपात करण्याचा कट होता, पण एखाद्या ठिकाणी हल्ला केल्यास भारतीय सुरक्षा यंत्रणा सावध होतील आणि अन्य ठिकाणी घातपात करता येणार नाही. त्यामुळे हा घातपात एकाच ठिकाणी न करता संधी मिळताच एकाच वेळी अनेक ठिकाणी घडवून आणण्याचा ‘इसिस’ नेत्याचा मानस होता. घातपात केव्हा करायचा यावरून इसिसवरून मतभेद निर्माण झाल्याने त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली. शफी आमार ऊर्फ युसूफ याच्यासह १६ जणांना एका ठिकाणाी मोहिमेत पकडण्यात आले होते. त्यांच्या अटकेनंतर कटाचा पर्दाफाश झाला. त्यात मुदब्बीर शेख होता.
हरिद्वार येथे घातपात करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला इकलाख याने मुदब्बीरची पाठ थोपटली होती, असेही गुप्तचर खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हा अधिकारी पुढे म्हणाला की, खान मोहंमद हुसैन या व्यापाऱ्याला माझगाव येथे अटक करण्यात आली आहे. त्याने घातपातासाठी लागणारे सर्व वित्तीय साह्य देण्याची तयारी दर्शविली होती. शिवाय त्याला देण्यात आलेली स्फोटके त्याने दिल्लीत पाठवली होती, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, हुसैनने लखनौमधील बैठकीला हजेरी लावून कारवायांसाठी अर्थसाह्य करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र या कटात थेट सहभाग घेण्यास तो तयार नव्हता. अफगाणिस्तानहून शफी अम्मार ऊर्फ युसूफला आदेश दिले जात होते आणि याच युसूफने हुसैनला १.५ किलो स्फोटके पुरविली होती. ही स्फोटके आपण स्वीकारली होती; ती आपण टॉयलेटमध्ये नष्ट केली, असे त्याने तपास यंत्रणांना सांगितले. पण हुसैनने जे सांगितले त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
हे प्रकरण एनआयएकडे सुपूर्द करण्यात आले आहे. मूूळचा उत्तर प्रदेशचा असलेला आणि महाराष्ट्रात अटक झालेला रिझवान शेखवर (२१) अन्सार उल तौहीदसाठी तरुणांच्या भरतीची जबाबदारी होती. हे सर्व जण अगोदर फेसबुकवर चॅटिंग करीत. नंतर त्यांनी व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला.