चीनचा शत्रू बनला भारताचा जवळचा मित्र, विएतनामला लष्करी बळ देण्याचा मोदींचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 10:41 AM2018-01-25T10:41:07+5:302018-01-25T10:49:01+5:30
दक्षिण चीन सागरातील चीनच्या वाढत्या दादागिरीने शेजारचे सर्व देश त्रस्त असून त्यामध्ये विएतनामचा सुद्धा समावेश आहे. समुद्रातील वादग्रस्त भागात चीनने बांधकाम थांबवलेले नाही.
नवी दिल्ली - दक्षिण चीन सागरातील चीनच्या वाढत्या दादागिरीने शेजारचे सर्व देश त्रस्त असून त्यामध्ये विएतनामचा सुद्धा समावेश आहे. समुद्रातील वादग्रस्त भागात चीनने बांधकाम थांबवलेले नाही. त्यामुळे भविष्यात युद्धाचा धोका उदभवण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी भारतात आलेले विएतनामचे पंतप्रधान ग्युयेन स्कॉन फुक आणि नरेंद्र मोदी यांनी सागरी सहकार्य वाढवण्यासंबंधी चर्चा केली.
चीनकडून असलेला धोका लक्षात घेता विएतनामला लष्करी दुष्टया बळकट करण्याचा भारताचा प्रयत्न असून दोन्ही देशातील लष्करी संबंध भविष्यात अधिक दृढ होतील. ग्युयने फुक यांच्याप्रमाणेच पंतप्रधान मोदींनी म्यानमारच्या प्रमुख ऑग सॅन स्यू कि आणि फिलिपाईन्सचे अध्यक्ष रॉड्रीगो डयुटीरटी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. मोदी मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात म्यानमार दौ-यावर गेले होते. त्यावेळी जे निर्णय झाले होते त्याबद्दल मोदी आणि स्यू कि यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.
म्यानमारच्या रखाईन प्रांतासाठी भारताने एक विकासाचा कार्यक्रम आखला आहे. त्यावर चर्चा झाली. म्यानमारच्या लष्करी कारवाईनंतर रखाईनमधून रोहिंग्या मुस्लिमांनी मोठया प्रमाणावर पलायन केले होते. ज्याचा भारतासह शेजारच्या देशांना त्रास झाला होता. बांगलादेशबरोबर झालेल्या करारानुसार म्यानमारमध्ये आता रोहिंग्या मुस्लिमांना पुन्हा प्रवेश दिला जात आहे. भारत म्यानमारमध्ये पायाभूत सोयी-सुविधांच्या उभारणीमध्ये सक्रीय असून तिथे सामाजिक-आर्थिक प्रगतीमध्ये आपले योगदान देत आहे.
भारत विएतनामला देणार मिसाईल
एनएसजी गटाचे सदस्यपद असो किंवा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला दहशतवादी घोषित करणे या विषयांवरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कोंडी करणा-या चीनला अद्दल घडवण्यासाठी भारताने विएतनामबरोबर लष्करीसंबंध विकसित करण्यावर भर दिला आहे.
चीनच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी भारत विएतनामला जमिनीवरुन हवेत मारा करणारी आकाश क्षेपणास्त्र देऊ शकतो. या क्षेपणास्त्राच्या विक्रीसंबंधी भारताची विएतनामबरोबर चर्चा सुरु आहे.
भारताने सध्या चीनच्या विरोधात असलेल्या जापान, विएतनाम या देशांबरोबर लष्करी संबंध विकसित करण्याला प्राधान्य दिले आहे. भारताने याआधी विएतनामला ब्राम्होस हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र देण्याचीही तयारी दाखवली होती. भारत यावर्षीपासून विएतनामच्या फायटर पायलटसना सुखोई-30एमकेआय हे अत्याधुनिक लढाऊ विमान चालवण्याचे प्रशिक्षण देणार आहे. चीनच्या शत्रूंना आपला मित्र बनवण्याची भारताची रणनिती आहे.