2019 मध्ये भाजपा जिंकल्यास भारताचा 'हिंदू पाकिस्तान' होईल- थरुर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 07:27 AM2018-07-12T07:27:13+5:302018-07-12T07:28:49+5:30
शशी थरुर यांच्या विधानावर भाजपाची सडकून टीका
तिरुअनंतपुरम : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयी झाल्यास देशाचा हिंदू पाकिस्तान होईल, असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. 'भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास नव्यानं घटना लिहिली जाईल. त्यामुळे भारतामधील परिस्थिती पाकिस्तानसारखी होईल. मग या देशात अल्पसंख्याकांच्या अधिकारांचा कोणताही सन्मान केला जाणार नाही,' असं थरुर म्हणाले.
शशी थरुर यांनी कडव्या हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपाला लक्ष्य केलं. 'ते (भाजपा) पुन्हा लोकसभा निवडणूक जिंकले तर, आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था संपेल. त्यांच्याकडून घटना उद्ध्वस्त केली जाईल. त्यांची नवी घटना हिंदू राष्ट्राच्या सिद्धांतावर आधारित असेल. त्यामुळे अल्पसंख्याकांचे अधिकार संपुष्टात येतील. देशाचा हिंदू पाकिस्तान होईल. महात्मा गांधी, नेहरु, सरदार पटेल, मौलाना आजाद आणि स्वातंत्र्यासाठी झटलेल्या अनेक महान व्यक्तींनी अशा देशासाठी संघर्ष केला नव्हता,' अशा शब्दांमध्ये थरुर यांनी भाजपाला लक्ष्य केलं.
थरुर यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. थरुर यांच्या विधानाबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपानं केली आहे. 'शशी थरुर यांच्या विधानाबद्दल राहुल यांनी माफी मागायला हवी. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी काँग्रेस पक्ष जबाबदार होता. काँग्रेसकडून हिंदूंची बदनामी केली जात आहे,' असं भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं. पात्रा यांनी ट्विटरवरुनदेखील काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'काँग्रेस हिंदूंना बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही. 'हिंदू दहशतवाद्यां'पासून 'हिंदू पाकिस्तान'पर्यंत... काँग्रेसची धोरणं ही पाकिस्तानला खूष करणारी आहेत,' असं पात्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.