पाकच्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर, 3 पाकिस्तानी जवान ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 01:21 PM2019-04-02T13:21:36+5:302019-04-02T13:24:14+5:30
पाकिस्तानकडून सीमाभागात वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या 3 जवानांना भारतीय जवानांनी ठार केलं
नवी दिल्ली - पाकिस्तानकडून सीमाभागात वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनालाभारतीय जवानांनी चोख उत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या 3 जवानांना भारतीय जवानांनी ठार केलं असून अन्य 1 जवान गोळीबारात जखमी झाला आहे. एलओसीवरील रावलकोट सेक्टरमध्ये भारतीय लष्करी जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबारात जशास तसे उत्तर दिले आहे. पाकच्या मिडीयाकडून अधिकृतरित्या ही आकडेवारी समोर आली असली तरी भारत-पाक गोळीबारात पाकिस्तानच्या 3 पेक्षा अधिक सैन्य मारले गेल्याची माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे.
Pakistan Army says 3 soldiers dead in Indian firing, Indian Army sources say toll higher
— ANI Digital (@ani_digital) April 2, 2019
Read @ANI story | https://t.co/69fsHcVX80pic.twitter.com/oOnjEz4zMU
शाहपूर, किरनी, कस्बा, मंधार, माल्टी या भागात भारताकडून पाकिस्तानी सैन्यांना लक्ष्य करण्यात आलं. अनेक दिवसांपासून पाकिस्तानकडून सीमाभागात गोळीबारी सुरु आहे. भारताच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय लष्कर आणि सामान्य नागरिकांवर गोळीबार सुरु होता. यात अनेक सामान्य नागरिक जखमी झाले. सोमवारी रात्रीपासून पाकिस्तानकडून मनकोट आणि पुंछ सेक्टरमध्ये सामान्य नागरिकांना पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात येत आहे. यामध्ये 4 लोकं जखमी झाले असून नजीकच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराने एलओसीवर पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांना टार्गेट करण्यात आलं.यामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याची माहिती मिळाली आहे. पुंछ सेक्टरमध्ये काल पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या बालकोट भागात एअर स्ट्राईक केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रावर एअर स्ट्राईक करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय जवानांनी केला तेव्हापासून पाकिस्तानकडून सीमाभागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. सोमवारी सकाऴापासूनच पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेला लागून असलेल्या मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानने शस्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार सुरू केला होता. या गोळीबारात भारताचे पाच जवान जखमी झाले. त्यापैकी एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.