'इंदिरा'ऐवजी चुकून 'अम्मा' बोलून फसले राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 03:23 PM2017-08-16T15:23:36+5:302017-08-17T12:10:54+5:30
तामिळनाडूतील 'अम्मा कॅन्टीन' योजनेच्या धर्तीवर आजपासून कर्नाटकमध्ये 'इंदिरा कॅन्टीन' योजना सुरु करण्यात आली आहे.
बंगळुरु, दि. 16 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी बंगळुरुत इंदिरा कॅन्टीनचं उद्घाटन केलं आहे. इंदिरा कॅन्टीनमध्ये पाच रुपयांत नाश्ता आणि 10 रुपयांत जेवण दिलं जाणार आहे. उद्घाटन केल्यानंतर राहुल गांधी यांनी कॅन्टीनमध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला. राहुल गांधी यांनी जयनगर वॉर्डमध्ये कॅन्टीनचं उद्दाटन करताना राज्यामधील काँग्रेस सरकारने अशा कॅन्टीनची कल्पना अंमलात आणली याचा गर्व असल्याचं सांगितलं. मात्र यावेळी बोलताना राहुल गांधींची चांगलीच पंचाईत झाली. कारण बोलताना राहुल गांधींनी इंदिरा कॅन्टीनचा 'अम्मा' असा उल्लेख केला. विशेष म्हणजे तामिळनाडूतील 'अम्मा कॅन्टीन' योजनेच्या धर्तीवर आजपासून कर्नाटकमध्ये 'इंदिरा कॅन्टीन' योजना सुरु करण्यात आली आहे.
'सर्वांना अन्न' या काँग्रेसच्या संकल्पनेकडे काँग्रसने उचललेलं हे पाऊल असल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. ते बोलले की, 'शहरातील कोणत्याही गरिबाला भुकेल्या पोटी राहावं लागू नये. बंगळुरुतील अनेक लोक मोठ्या घरात राहतात, महागड्या गाड्यांमध्ये फिरतात, त्यांच्यासाठी अन्न ही काही मोठी गोष्ट नाहीय मात्र येथे अनेक गरिब लोकही राहतात, ज्यांच्याकडे जास्त पैसे नसतात. इंदिरा कॅन्टीन अशा लोकांची सेवा करेल'.
Karnataka: Congress VP Rahul Gandhi takes a meal at the newly inaugurated Indira Canteen in Bengaluru. pic.twitter.com/h0agD1V4o5
— ANI (@ANI) August 16, 2017
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी बजेट सादर करताना अशा प्रकारची कॅन्टीन सुरु करण्याची घोषणा केली होती. कर्नाटकाचे वित्तखाते सिध्दरामय्या यांच्याकडेच असून, त्यांनी बजेट वाचनामध्ये नम्मा कॅन्टीन असा उल्लेख केला होता. पण काँग्रेसच्या आमदारांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर 'इंदिरा कॅन्टीन' असे या योजनेचे नामकरण करण्यात आले. अम्मा कॅन्टीन योजना तामिळनाडूत प्रचंड लोकप्रिय ठरली. जयललिता यांच्या अण्णाद्रमुकला सलग दुस-यांदा सत्तेत पोहचवण्यात ही योजनी महत्वपूर्ण ठरली होती.
उत्तरप्रदेशात योगींनी सुरु केली अन्नपूर्ण योजना
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एप्रिलमध्ये अन्नपूर्णा योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यातील जनतेने त्याचे स्वागत केले. पण फार कमी जणांना माहिती असेल कि, योगी 2008 पासून गोरखपूरमध्ये अशा प्रकारची योजना राबवत आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीपद स्विकारण्याआधीच गोरखपूरचे खासदार असतानाच योगींनी अन्नपूर्णा भोजना सेवा योजना सुरु केली होती. या योजनेत गरीबांना फक्त 10 रुपयात जेवणाची थाळी मिळते. यामध्ये दोन चपाती, डाळ, भात आणि दोन भाज्या मिळतात.