Indira Gandhi Death Anniversary : ...म्हणून इंदिरा गांधींना म्हणतात भारताची 'आयर्न लेडी'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 08:52 AM2018-10-31T08:52:23+5:302018-10-31T08:53:01+5:30

इंदिरा गांधींना 1971मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

Indira Gandhi Death Anniversary: ​​national why is indira gandhi called the iron lady of india | Indira Gandhi Death Anniversary : ...म्हणून इंदिरा गांधींना म्हणतात भारताची 'आयर्न लेडी'

Indira Gandhi Death Anniversary : ...म्हणून इंदिरा गांधींना म्हणतात भारताची 'आयर्न लेडी'

googlenewsNext

नवी दिल्ली - इंदिरा गांधींची आज 34वी पुण्यतिथी आहे. वडील जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या राजकारणात आल्या. त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. शास्त्री यांच्या निधनानंतर त्या देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधींना 1971मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

इंदिरा गांधी या भारताच्या एक सशक्त महिला पंतप्रधान राहिल्या आहेत. ज्यांच्या अढळ निर्णयांनी जगाला भारतापुढे झुकायला भाग पाडलं होतं. त्यांच्या कणखर भूमिका अन् कठोर निर्णयक्षमतेमुळेच बांगलादेश हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला. भारतानं त्यांच्या कार्यकाळात अवकाश क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. पंजाबमध्ये उफाळून आलेला हिंसाचार थोपवण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तसेच त्यांच्या कार्यकाळात भारत आण्विक संपन्न देश झाला. त्यांच्या कठोर निर्णय घेण्याच्या भूमिकेला विरोधकांनी नेहमीच विरोध केला. परंतु त्या कोणालाही न जुमानता देशाहिताचे निर्णय घेत राहिल्या. त्यामुळेच त्यांना आयर्न लेडी म्हटलं जातं.

इंदिरा गांधींच्या कार्यकाळात 18 मे 1974मध्ये भारतानं राजस्थानमधल्या पोखरणमध्ये अणुचाचणी केली. त्यानंतर अमेरिकेनं भारतावर निर्बंध लादले. परंतु त्या सर्व गोष्टींना निडर होऊन सामो-या गेल्या. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धातही त्यांच्या कूटनीतीमुळेच भारतानं विजय मिळवला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या मदतीसाठी अमेरिकेनं स्वतःची अण्वस्त्रसज्ज युद्धनौका पाठवली होती. तेव्हा त्यांनी याची कल्पना रशियाला देऊन भारत आणि रशियामध्ये झालेल्या मैत्रीच्या कराराचा हवाला देत मदत मागितली. रशियाही या युद्धात भारताच्या बाजूनं उभा राहिला अन् अमेरिकेला स्वतःची युद्धनौका माघारी बोलवावी लागली. त्यांच्या कूटनीतीमुळेच भारतानं त्या युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला होता. परंतु त्यांचे काही निर्णय जनतेलाही रुचलेले नाही. जनता आपल्या विरोधात जातेय याची जाणीव त्यांना झाल्यानंतर त्यांनी आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी त्यांच्यावर खूप टीका झाली. 1984मध्ये त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारला परवानगी दिली आणि ते चर्चेत राहिलं. जनरल सिंग भिंड्रावाला, कोर्ट मार्शल केलेले मेजर जनरल सुभेग सिंग, शीख स्टुडंट् फेडरेशननं सुवर्ण मंदिरावर कब्जा मिळवला होता. तेव्हा त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारच्या माध्यमातून सुवर्ण मंदिराला या दहशतीतून मुक्त केलं. त्यानंतर 30 ऑक्टोबरला त्यांनी शेवटचं भाषण केलं.

त्या म्हणाल्या होत्या, मी आज आहे, उद्या नसेन, पण मला त्याची पर्वा नाही. मी माझं पूर्ण जीवन देश आणि जनतेच्या सेवेसाठी व्यतित केलं आहे. देशाला मजबूत करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कठोर निर्णय घेत राहीन. त्यानंतर दुस-या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली. परंतु त्यांच्या कठोर निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे त्या आजही जनतेच्या स्मरणात आहेत. 

Web Title: Indira Gandhi Death Anniversary: ​​national why is indira gandhi called the iron lady of india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.