काश्मीरच्या माचिल सेक्टरमध्ये घुसखोरीचा कट उधळला, दोन दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 10:08 AM2017-09-16T10:08:31+5:302017-09-16T10:11:44+5:30
सर्तक असलेल्या जवानांनी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माचिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावला.
कुपवाडा, दि. 16 - सर्तक असलेल्या जवानांनी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माचिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. अजूनही या भागात शोध मोहिम सुरु आहे. मागच्या काही महिन्यात जवानांनी दहशतवाद्यांचे घुसखोरीचे अनेक प्रयत्न उधळून लावले आहेत. यावेळी अनेक दहशतवादी ठार झाले आहेत.
दोन दिवसापूर्वीच अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू इस्माईल ठार झाला. नौगाम येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी अबू इस्माईलला ठार केलं. अमरनाथमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अबू इस्माईल सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. अखेर त्याला ठार करण्यात भारतीय लष्कराच्या जवानांना यश मिळालं. अबू इस्माईल पाकिस्तानी नागरिक आहे, अबू दुजानासोबत त्याने काश्मीरमधील अनेक अतिरेकी हल्ल्यांमध्ये सहभाग घेतला होता. अमरनाथ दहशतवादी हल्ल्यानंतर बोलताना काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी अबू इस्माईल हल्ल्यात सहभागी होता असं सांगितलं होतं.
लष्कराला मोठं यश
जम्मू काश्मीरमध्ये 2012 रोजी 72 तर 2013 मध्ये 67 दहशतवादी ठार करण्यात आले होते. एनडीएच्या कार्यकाळात 2014 मध्ये हा आकडा वाढून 110 वर पोहोचला. 2015 मध्ये एकूण 108, तर 2016 मध्ये 150 दहशतवादी मारले गेले. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, "यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार केल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या 2014 आणि 2015 मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्यापेक्षा थोडी कमी आहे". दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या चोख कारवाईचं श्रेय लष्कर, केंद्रीय दलं, राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणांमधील उत्तम समन्वयाचं आहे.
कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा
यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितल्यानुसार, "सुरक्षा जवानांना खो-यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन, त्यांचा खात्मा करण्यासाठी मोकळीक दिली आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु करण्याआधी संपुर्ण प्लान तयार केला जातो. तसंच कमीत कमी नुकसान करुन दहशतवाद्यांना कसं ठार करता येईल याकडेही लक्ष दिलं जातं".
#FLASH: Infiltration bid foiled in Machil sector of J&K's Kupwara district; two terrorists gunned down. Operation underway. pic.twitter.com/5rLlf6d9DO
— ANI (@ANI) September 16, 2017