10 रुपये गुंतवा आणि कमवा भरघोस नफा, पोस्टाची जबरदस्त योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 04:39 PM2018-08-19T16:39:43+5:302018-08-19T17:53:14+5:30
अनेकदा बँका किंवा विमा संरक्षण कंपन्यांच्या माध्यमांतून ग्राहकांना चांगल्या योजना मिळत असतात.
नवी दिल्ली- अनेकदा बँका किंवा विमा संरक्षण कंपन्यांच्या माध्यमांतून ग्राहकांना चांगल्या योजना मिळत असतात. परंतु आता तुम्हाला पोस्टानं एक फायदेशीर योजना उपलब्ध करून दिली आहे. पोस्टानं ग्राहकांसाठी आणलेल्या या योजनेत ग्राहकांना भरघोस नफा कमावता येणार आहे. पोस्टानं छोट्या योजनेच्याद्वारे रेकरिंग डिपॉझिटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या योजनेमार्फत तुम्ही बचत खात्यावर व्याजाच्या माध्यमातून जास्तीचा नफा कमावू शकणार आहात.
या योजनेत तुम्ही 10 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. ज्यांचा महिन्याचा पगार फार कमी आहे, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. ब-याच बँका सेव्हिंग अकाऊंटवर 3.5 ते 4 टक्के व्याज देतात. जे महागाईच्या तुलनेत फारच कमी आहे. तर दुसरा पर्याय हा बँकेच्या एफडीचा असतो. एफडीमध्ये तुम्हाला व्याज जास्त मिळतं. परंतु पैसे मोठ्या काळासाठी बँकेत ठेवावे लागतात. त्यामुळेच पोस्ट ऑफिसची छोटी योजना असलेली आरडी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. पोस्टाच्या 1 वर्षांपासून 5 वर्षांपर्यंत ठेवलेल्या आरडी योजनेवर 6.9 टक्के व्याज मिळतं.
बचत खातं- तुम्ही बँकेत अथवा पोस्टात सेव्हिंग अकाऊंटमध्ये प्रत्येक महिन्याला 2 हजार रुपये ठेवल्यास 5 वर्षांत तुमचे 1.20 लाख रुपयांची गुंतवणूक होते. त्याच प्रमाणे वर्षाला 4 टक्क्यांचं व्याज मिळून तुम्हाला 1,35,191 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला 15,191 रुपयांचं निव्वळ व्याज मिळणार आहे.
आरडी- तुम्ही आरडीमध्ये दर महिन्याला 2 हजार रुपये जमा करत असल्यास 5 वर्षांत तुमची जमा झालेली रक्कम 1.20 लाख रुपयांच्या घरात जाते. त्यातच तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या आरडीवर क्वाटर्ली कंपाऊंडिंगनुसार 6.9 टक्के व्याज मिळते. त्यामुळे तुम्हाला 5 वर्षांत जवळपास 1,44,305 रुपये फायदा मिळतो. जेणेकरून तुम्हाला फक्त 24,305 रुपये अतिरिक्त मिळतात.
तुम्ही आरडी खातं हे ऑनलाइनही उघडू शकता. मोबाइल अॅपच्या माध्यमातूनही तुम्हाला आरडी उघडण्याचा पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला धनादेशाद्वारेही पोस्ट ऑफिसमध्ये आरडी उघडता येते. कॅश देऊनही तुम्ही आरडीचं खातं उघडू शकता.