जवानांनी स्नायपर्सला घातले कंठस्नान, दहशतवादी मसूद अझरच्या भाच्याचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 07:38 IST2018-10-31T07:37:52+5:302018-10-31T07:38:07+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश मिळालं आहे. लष्कराच्या जवानांनी पुलवामातल्या त्रालमध्ये जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

जवानांनी स्नायपर्सला घातले कंठस्नान, दहशतवादी मसूद अझरच्या भाच्याचा खात्मा
काश्मीर- जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश मिळालं आहे. लष्कराच्या जवानांनी पुलवामातल्या त्रालमध्ये जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यात पाकिस्तानच्या स्नायपरचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हा स्नायपर दहशतवादी मसूद अझरचा भाचा आहे, अशीही माहिती समोर आली आहे. मंगळवारी त्रालमधल्या मंडुरा इथे दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. तेव्हा त्याचा खात्मा करण्यात आला. हा भाग दक्षिण काश्मीरमध्ये येतो.
रिपोर्टनुसार, लष्करानं गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार या भागात सर्च ऑपरेशन राबवलं होतं. त्यातच उस्मान हैदर हा स्नायपर लष्कराच्या हल्ल्यात ठार झाला. या ऑपरेशनमध्ये 42 राष्ट्रीय रायफल्स, एसओजी आणि सीआरपीएफच्या जवानांचा समावेश होता. जवानांनी त्रासमधल्या दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. लष्करी जवानांबरोबर झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ज्या घरातून हे दहशतवादी गोळीबार करत होते. लष्कराच्या जवानांनी ते घरच उडवून दिलं. त्या ठिकाणाहून जवानांनी दोन दहशतवाद्यांचे मृतदेह आणि एमफोर स्नायपर रायफल हस्तगत केली आहे. सप्टेंबरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन गट काश्मीरमध्ये आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती. त्या दोन गटांमध्ये एकूण चार प्रशिक्षित दहशतवाद्यांचा (स्नायपर्स) समावेश होता.
काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात जवान जखमी झाले होते. तेव्हापासूनच हे स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने या चौघांनाही प्रशिक्षण दिल्याची माहिती उघड झाली आहे. स्नायपर्सकडे एम-4 कार्बाइन्स रायफल्स आहेत. स्नायपर्स नाईट व्हिजन डिव्हाईसचा वापर करून रात्रीच्या वेळी 500 ते 600 मीटर अंतरावर असून देखील लपून वार करू शकतात. त्यामुळे डोंगरातून हल्ले करणे सोपे जाते. लष्कर आणि सुरक्षा दलांपुढे या इतर स्नायपर्सना शोधून त्यांचा खात्मा करण्याचं मोठे आव्हान आहे.