जेटली मानहानीप्रकरणी न्यायालयानं केजरीवालांना ठोठावला 10 हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 04:13 PM2017-07-26T16:13:33+5:302017-07-26T20:57:12+5:30
दिल्ली उच्च न्यायालयानं जेटली अवमान प्रकरणात केजरीवालांना खडे बोल सुनावले आहेत.
नवी दिल्ली, दि. 26 - दिल्ली उच्च न्यायालयानं जेटली अवमान प्रकरणात केजरीवालांना खडे बोल सुनावले आहेत. आम आदमी पार्टीच्या पाच नेत्यांविरोधात जेटलींनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यातील सुनावणीवेळी जेटलींना अपमानास्पद प्रश्न विचारू नये, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं आपच्या नेत्यांना दिले आहेत. तसेच या प्रकरणात कोर्टानं केजरीवालांना 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायमूर्ती मनमोहन म्हणाले, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी केंद्रीय अर्थमंत्री जेटलींशी सन्मानानं आणि कायद्याच्या भाषेनुसार त्यांचा आदर केला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवली पाहिजे. न्यायालयात अभद्र भाषेचा कोणीही वापर करू नये. तसेच मानहानी खटल्यात योग्य रीतीनं जबाब नोंदवून घेतले पाहिजेत. जेटली मानहानी प्रकरणात केजरीवालांसह राघव चड्ढा, कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह आणि दीपक वाजपेयींनाही आरोपी बनवण्यात आलं आहे. अरुण जेटलींनी 2000 ते 2013मध्ये डीडीसीएच्या अध्यक्षपदावर असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप आप नेत्यांनी केला होता. जेटलींनी ते आरोप फेटाळूनही लावले आहेत.
तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या 10 कोटींच्या बदनामी दाव्याचा खटला लढणारे प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी केजरीवाल यांना सोडचिठ्ठी दिली आहे. जेठमलानी यांनी केजरीवाल यांना एक पत्र लिहून या प्रकरणातून बाजूला होत असल्याचं सांगितलं आहे. तसंच या खटल्याचं 2 कोटी रुपयांहून अधिक फी द्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे. जेठमलानी यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात,'केजरीवाल हे अरुण जेटलींच्या विरूद्ध जास्त आक्षेपार्ह भाषेचा वापर करायचे', असा आरोप केला आहे. जेठमलानी यांनी त्यांच्या 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त कायदेशीर फीची मागणीही केली आहे.
केजरीवाल आणि इतर पाच आप नेत्यांविरोधात अरुण जेटली यांनी 10 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीवेळी जेठमलानी यांनी केजरीवाल यांची बाजू मांडताना केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्याविरोधात असभ्य भाषेचा वापर केला होता. केजरीवाल यांनी दिलेल्या सूचनेवरून असभ्य भाषेचा वापर केला का, याबाबत जेटली यांनी स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यावेळी जेठमलानी यांनी आपण केजरीवाल यांच्या सूचनेनुसारच असभ्य भाषेचा वापर केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर जेटली यांनी केजरीवाल यांच्याविरोधात आणखी एक मानहानीचा खटला दाखल केला होता. हा नवा खटला दाखल झाल्यानंतर केजरीवाल यांनी दिल्ली हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. तसंच जेटली यांच्याविरोधात असभ्य भाषा वापरली जावी, अशा कोणत्याही सूचना आपण दिल्या नव्हत्या, असं त्यांनी जेठमलानी यांना पत्रात सांगितलं होतं