जम्मू काश्मीर : जवानांनी केला लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 07:46 AM2017-08-07T07:46:02+5:302017-08-07T09:33:23+5:30
श्रीनगर, दि. 7 - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील सम्बुरा येथे सुरक्षा दलानं लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आणखी दहशतवादी परिसरात लपून बसला आहे. जवानांनी परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
सम्बुरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी रात्री 50 राष्ट्रीय रायफल्स आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत परिसराला घेराव घातला. यानंतर शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. जवानांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला.
दरम्यान, गेल्या काही चार दिवसांत आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शनिवारी ( 5 ऑगस्ट ) सकाळी सोपोर जिल्ह्यातील अमरगड येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तीन एके-47 जप्त करण्यात आल्या आहेत.
J&K:Encounter begins between security forces&terrorists in Pulwama's Samboora,2 terrorists suspected to be present; More details are awaited pic.twitter.com/rMniUdBIMJ
— ANI (@ANI_news) August 6, 2017
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ठार
दरम्यान, शुक्रवारी ( 4 ऑगस्ट ) जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी ठार मारला गेला. स्थानिक पोलिसांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला. एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर त्यांनी परिसराला घेराव घातला व शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्री अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि तेथून पसार होण्यात त्यांना यश आले.
यानंतर एन्काऊंटरमध्ये एका बाईकस्वाराला ठार करण्यात आले. ठार करण्यात आलेला व्यक्ती हा हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी होता, असे पोलिसांनी सांगितले. या दहशतवाद्याकडून रायफल, चिनी हॅण्ड ग्रेनेडसहीत अन्य दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या चकमकीत 3 राष्ट्रीय रायफल्सचे एक जवान जखमी झाला आहे.
दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद
गुरुवारीदेखील ( 3 ऑगस्ट ) जम्मू काश्मीरमधील शोपियान व कुलगाम येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यातील एका दहशतवाद्याचं नाव आकिब असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर शोपियानमध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्यात एक मेजर व दोन जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीननं शोपियान हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. यात अल्ताफ खुचरू सामिल होता, असे वृत्त समोर आले आहे. तो टॉप हिजबुल कमांडर असल्याचे बोलले जात आहे.
लष्कर-ए-तोयबाच्या अबू दुजानाचा खात्मा
मंगळवारी ( 1 ऑगस्ट ) भारतीय लष्कराने लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर अबू दुजाना आणि त्याचा साथीदार आरिफचा एन्काऊंटर केला. भारतीय लष्कराचे हे मोठे यश असल्याचे मानले जातात.