2002 ते 2017 : असा आहे डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याचा जेलपर्यंतचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 11:10 AM2017-08-28T11:10:49+5:302017-08-28T15:44:13+5:30
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी न्यायालयाने बाबा राम रहीमला दोषी ठरवलं होतं.
चंदीगड, दि. 28 - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी (25 ऑगस्ट )न्यायालयाने बाबा राम रहीमला दोषी ठरवलं होतं. दोषी ठरवल्यानंतर झालेला हिंसाचार लक्षात घेता तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात आली. निकाल सुनावण्यासाठी न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात आणण्यात आलं होतं. राज्यातही प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी न्यायालायने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान राम रहीम कोर्टरुममध्ये हात जोडून उभा असून दयेसाठी याचना करत होता. इतकंच नाही तर रडूही लागला होता. 2002मध्ये हे प्रकरण उजेडात आले होते. 2002 पासून ते आतापर्यंतच्या या प्रकरणातील घडामोडींवर एक नजर टाकूया
गुरमीत राम रहीमविरोधातील खटला प्रकरण
2002 पासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम
एप्रिल 2002 : सिरसातील डेरा सच्चा सौदा येथे महिला अनुयायांचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार करणारे निनावी पत्र पंजाब व हरियाणा हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना लिहिण्यात आले होते.
मे 2002 : हायकोर्टानं सिरसा जिल्हा आणि सत्र न्यायालयाला डेरा सच्चा सौदाविरोधात पत्राद्वारे करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले.
सप्टेंबर 2002 : महिला अनुयायांचं लैंगिक शोषण होत असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर हायकोर्टानं पुढील चौकशीसाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले.
डिसेंबर 2002 : सीबीआयनं डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीमविरोधात बलात्कार व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
जुलै 2017 : सीबीआयनं अंबाला कोर्टात गुरमीत राम रहीमविरोधात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात 1999 ते 2001 यादरम्यान दोन साध्वींचे (महिला अनुयायी) लैंगिक शोषण करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.
सप्टेंबर 2008 : सीबीआयच्या विशेष न्यायालयानं गुरमीत राम रहीमविरोधात कलम 376 (बलात्कार) आणि 506 (धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
2009 ते 2010 दरम्यान तक्रारकर्त्यांनी कोर्टासमोर आपला जबाब नोंदवला
एप्रिल 2011 : गुरमीत राम रहीमविरोधातील खटला प्रकरण अंबाला कोर्टातून पंचकुला सीबीआय कोर्टाकडे वर्ग करण्यात आला.
जुलै 2017 : विशेष सीबीआय न्यायालयाकडून नियमित सुनावणीचे आदेश
ऑगस्ट 17, 2017 : फिर्यादी व बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी शिक्षा सुनावण्यासाठी 25 ऑगस्टची तारीख निश्चित केली.
ऑगस्ट 25, 2017 : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कारप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले.
ऑगस्ट 28, 2017 : गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
गुरमीत राम रहीमला पळवण्याचा होता कट
दरम्यान बाबा गुरमीत राम रहीमयांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्यांना कोर्टाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट होता, अशी माहिती समोर आली आहे. एकूण सात जणांनी मिळून राम रहीम यांना पळवून नेण्याचा कट आखला होता. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हरियाणाच्याच काही पोलिसांचाही समावेश होता. तर इतर दोन जण खासगी सुरक्षा रक्षक होते. मात्र या सात जणांची तिथे तैनात असलेल्या इतर पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांना कटाचा अंदाज आल्यामुळे राम रहीमला पळवण्याचा प्लॅन फसला. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण सात जणांचा बाबाला पळवून नेण्याचा कट होता. यामध्ये पाच हरियाणा पोलिसांचाही समावेश होता. हे पाचजण गेल्या 5 ते 6 वर्षांपासून बाबाच्या झेड प्लस सुरक्षेचा हिस्सा होते. याशिवाय इतर दोन जण हे खासगी सुरक्षा रक्षक होते. हेड कॉन्स्टेबल अजय, कॉन्स्टेबल राम सिंह, हेड कॉन्स्टेबल विजय सिंह, सब इन्स्पेक्टर बलवान सिंह आणि कॉन्स्टेबल किशन कुमार या पाच हरियाणा पोलिसांचा यामध्ये समावेश होता. तर प्रितम सिंह आणि सुखबीर अशी इतर खासगी सुरक्षा रक्षक असलेल्यांची नावं आहेत.
समर्थकांनी एकत्रित यावे, यासाठी फोन कॉल करण्यात आले-
पळवून नेण्याचा प्रयत्न फसल्यानंतर डेरा समर्थकांनी पंचकुलामध्ये एकत्रित व्हावे यासाठी फोन करण्यात आले होते. समर्थकांनी काय करावे, याबाबतच्या सूचनाही त्यांना दिल्या जात होत्या. न्यायालयाच्या आवारात येऊ नये कारण तेथे जास्त फौजफाटा आहे, अशा सूचनाही समर्थकांना देण्यात आल्या होत्या.
सीबीआय कोर्टाने डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर गुरमीत राम रहीमला 28 ऑगस्टला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
#Punjab: Flag march being conducted by police and Rapid Action Force in Barnala ahead of rape convict Dera Chief #RamRahimSingh's sentencing pic.twitter.com/IisHCbCReB
— ANI (@ANI) August 28, 2017
Meeting is underway at North Block to discuss security situation in Punjab, Haryana ahead of #RamRahimSingh's sentencing
— ANI (@ANI) August 28, 2017