Karnataka Assembly Election 2018- काँग्रेस, भाजपा असो वा जेडीएस...घराणेशाहीत अडकले कर्नाटकातील पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 11:11 AM2018-04-26T11:11:49+5:302018-04-26T11:11:49+5:30

कर्नाटकच्या राजकीय स्थितीवर नजर टाकली तर तिन्ही पक्षामध्ये जबरदस्त घराणेशाही असल्याचे दिसून येते. कर्नाटकात वारंवार पक्ष बदलण्याची पद्धतीही दिसून येते. अनेक नेत्यांनी दोनपेक्षा जास्त पक्ष बदलल्याची उदाहरणे या राज्यात आहेत.

Karnataka Assembly Election 2018- Dynasty Politics run political parties in Karnataka | Karnataka Assembly Election 2018- काँग्रेस, भाजपा असो वा जेडीएस...घराणेशाहीत अडकले कर्नाटकातील पक्ष

Karnataka Assembly Election 2018- काँग्रेस, भाजपा असो वा जेडीएस...घराणेशाहीत अडकले कर्नाटकातील पक्ष

Next
ठळक मुद्देमाजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे कर्नाटकच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रीही होते. सध्या देवेगौडा हसन येथून लोकसभेत ते लोकप्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.

बेंगळुरु- कर्नाटक विधानसभेसाठी 12 मे रोजी मतदान होत आहे. काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि जनता दल धर्मनिरपेक्ष हे कर्नाटकातील तीन महत्त्वाचे पक्ष सरकारस्थापनेसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र कर्नाटकच्या राजकीय स्थितीवर नजर टाकली तर तिन्ही पक्षामध्ये जबरदस्त घराणेशाही असल्याचे दिसून येते. कर्नाटकात वारंवार पक्ष बदलण्याची पद्धतीही दिसून येते. अनेक नेत्यांनी दोनपेक्षा जास्त पक्ष बदलल्याची उदाहरणे या राज्यात आहेत.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे कर्नाटकच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रीही होते. सध्या देवेगौडा हसन येथून लोकसभेत ते लोकप्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. ते सध्या रामनगर मतदारसंघातून विधानसभेत गेले आहेत. त्यांची पत्नी अनिता कुमारस्वामी या यापूर्वी मधुगिरी मतदारसंघातून निवडणूक लढविली होती आणि त्या आमदारही झाल्या होत्या. त्यांचे दुसरे पुत्र एच. डी. रेवण्णा होळेनरसिंहपूर मतदारसंघातून विधानसभेत गेले असून त्यांनी कर्नाटकात कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. होळेनरसिंहपूर हा एच. डी. देवेगौडा यांचा जुना मतदारसंघ असून ते प्रदीर्घ काळासाठी या जागेचे प्रतिनिधित्व कर्नाटक विधानसभेत करत होते. रेवण्णा यांची पत्नी भवानी रेवण्णा या जिल्हा परिषद सदस्या आहेत.

काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे नव्या विधानसभेसाठी चामुंडेश्वरी आणि बदामी या दोन मतदारसंघातून नशिब आजमावत आहेत. मावळत्या विधानसभेत ते वरुणा मतदारसंघातून निवडले गेले होते. आता या जागेवर त्यांचा मुलगा डॉ. यतींद्र निवडणूक लढवत आहे. कर्नाटकातील काँग्रेससाठी दुसरे महत्त्वाचे नाव आहे ते म्हणजे मल्लिकार्जून खर्गे यांचे. मल्लिकार्जून खर्गे हे लोकसभेत काँग्रेसचे गटनेते आहेत, तर त्यांचे पुत्र प्रियांक खर्गे हा चितापूर येथून विधानसभेत निवडून गेले असून ते कॅबिनेट मंत्रीही आहेत. एम. वीरप्पा मोईली हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत, ते सध्या चिकबल्लारपूर मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करत असून त्यांचे पुत्र हर्ष मोईली करकला या मतदारसंघातून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करत होता. या जागेवर मोईली यांनी यापुर्वी विजय संपादित केला आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते धरमसिंग यांचा मुलगा अजय सिंग जेवर्गी मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेला आहे. तर त्यांचा दुसरा मुलगा विजय सिंग हा विधानपरिषद सदस्य असून बिदर लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी त्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर धरम सिंग यांची सून चंद्रा सिंग यांना बिदर दक्षिण या मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल असे वाटत होते मात्र त्यांना त्यात अपयश आले. एस. शिवशंकराप्पा हे माजी मंत्री असून ते काँग्रेसच्या तिकीटावर दावणगेरे दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या करत आहेत त्यांचा मुलगा एस. एस. मल्लिकार्जून दावणगेरे उत्तर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो.

सी. बैरे गौडा हे सीपीआय, जनता दल आणि दनता पार्टी अशा पक्षांचे सदस्य होते. ते कॅबिनेट मंत्रीही होते. त्यांचे पुत्र कृष्णा बैरे गौडा ब्यात्र्याणपुरा मतदारसंघातून जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाच्या तिकिटावर विधानसभेत गेले आहेत. हिरोजी लाड हे जनता पार्टीचे नेते विधानपरिषदेचे सदस्य होते. त्यांचे पुत्र अनिल लाड हे माजी खासदार असून सध्या ते बळ्ळारीमधून आमदार म्हणून निवडून गेले आहेत. पुर्वी ते भाजपामध्ये होते आता ते जनता दल सेक्युलरमध्ये आहेत. हिरोजी यांचा भाचा संतोष लाड कलघटगी येथून विधानसभेत गेला असून तो पुर्वी जनता दल धर्मनिरपेक्षमध्ये होता, आता तो काँग्रेसमध्ये आहे.



भारतीय जनता पार्टीचे महत्त्वाचे नेते, माजी मुख्यमंत्री आणि येत्या विधानसभेसाठी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडीयुरप्पा हे सध्या शिवमोग्गा येथून लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. त्यांचा मुलगा राघवेंद्र मावळत्या विधानसभेत शिकारीपुरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तर त्यांचा दुसरा मुलगा विजयेंद्रमला वरुणा मतदारसंघातून तिकीट मिळेल अशी चर्चा होती. मात्र येडीयुरप्पा यांनी तशी शक्यता नाकारली आहे. असे झाले असते तर दोन्ही पक्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांचे पुत्र एकाच मतदारसंघात आमनेसामने आले असते. त्यातून वरुणा हा मतदारसंघाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रतिनिधितत्व केले असल्यामुळे ती निवडणूक चुरशीची झाली असती.

एस. बंगारप्पा हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री होते. तसेच ते शिवमोग्गा येथून खासदारही होते. त्यांची राजकीय कारकिर्द काँग्रेस, भाजपा, जनता दल धर्मनिरपेक्ष, समाजवादी पक्ष अशा विविध पक्षांमध्ये गेली आहे.  त्यांचे पुत्र कुमार बंगारप्पा काँग्रेसच्या तिकिटावर सोराबा मतदारसंघात विजयी होऊन मंत्रीही झाले होते, त्यानंतर ते समाजवादी पक्षात गेले, आता ते भाजपात आहेत. मधु बंगारप्पा हे त्यांचे दुसरे पुत्र सोराबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करतात आणि ते जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षात आहेत. एस. बंगारप्पा यांची कन्या गीता शिवराजकुमार यांनी जनता दल सेक्युलरतर्फे शिवमोग्गा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. 

एम. कृष्णाप्पा हे विजयनगर येथून आमदार असून ते कॅबिनेट मंत्री आहेत तर त्यांचा मुलगा प्रिय कृष्णा गोविंदराजनगर येथून आमदार म्हणून निवडून गेला आहे. एच. एस. महादेवप्रसाद हे माजी कॅबिनेट मंत्री होते त्यांची पत्नी मोहनकुमारी ऊर्फ गीता या गुंडलूपेट येथून विधानसभेत निवडून गेल्या आहेत आणि त्या कॅबिनेट मंत्रीही आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आर. गुंडू राव यांचा मुलगा दिनेश गुंडु राव याने कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली असून सध्या गांधीनगर येथून काँग्रेसतर्फे आमदार आहे.



सध्याचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांची मुलगी सौम्या रेड्डी काँग्रेसच्या तिकिटावर जयनगर येथून निवडणूक लढवत आहे. कायदामंत्री टी. बी. जयचंद्र यांचा मुलगा संतोष जयचंद्र चिकनायकनहळ्ळी येथून निवडणूक लढवत आहे. कोलारचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री के. एच. मुनिअप्पा यांची मुलगी रुपा शशीधर केजीएफ (कोलार गोल्ड फिल्ड्स) मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.  एच. नागप्पा हे जनता दलातर्फे विधानसभेत जाऊन कॅबिनेट मंत्री झाले होते, त्यांची पत्नी जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षातर्फे हानूर मतदारसंघाच्या प्रतिनिधित्व करत होत्या, त्यांच्या मुलगा प्रीतम नागप्पा हानूर येथूनच निवडणूक लढवत आहेत मात्र त्यांना भाजपाने तिकीट दिले आहे. कुमरुल इस्लाम हे काँग्रेसचे गुलबर्गा उत्तर मतदारसंघाचे आमदार होते, ते कॅबिनेट मंत्रीही होते, आता त्यांची फातिमा इस्लाम या याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. रुद्रै गौडा हे बेलूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असत, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी किर्तना रुद्रै गौडा यांना याच मतदारसंघातून काँग्रेसने संधी दिली आहे.

Web Title: Karnataka Assembly Election 2018- Dynasty Politics run political parties in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.