Karnataka Assembly Election 2018- बदामी आणि चामुंडेश्वरी दोन्ही जागांवर जिंकण्याचा सिद्धरामय्यांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 02:28 PM2018-04-24T14:28:19+5:302018-04-24T14:28:19+5:30
हुबळी- कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दिवसेंदिवस प्रचाराला वेग येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांच्या म्हैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघातून तसेच बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथून निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही जागांवरुन आपण विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 12 मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान होत असून सर्व जागांवर एकाच दिवसात मतदान होणार आहे.
बदामी येथे निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी जात असताना हुबळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या यांनी आपण दोन्ही जागांवरुन निवडून येऊ अशी खात्री व्यक्त केली. तसेच आपला मुलगा डॉ. यतींद्र वरुणा मतदारसंघातून 50 हजार मताधिक्याने निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात लोकांनी काँग्रेसने चालवलेलं उत्तम प्रशासन पाहिलं आहे, त्यामुळे काँग्रेसच पुन्हा सत्तेत येईल असं त्यांनी सांगितलं. बदामी आणि चामुंडेश्वरी या दोन्ही मतदारसंघात सकारात्मक वातावरण असल्याचंही त्यांनी मत व्यक्त केलं. मैसूरमधील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघात सिद्धरामय्या यांना मोठे आव्हान जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवाराचे आहे. ही व्यक्ती म्हणजे त्यांचेच एकेकाळचे सहकारी जी. टी देवेगौडा. यामुळे सिद्धरामय्या यांना काँग्रेसच्या इतर जागांवरील प्रचारापेक्षा आपल्या मतदारसंघासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे. याचा परिणाम निकालांवर दिसून येईल असा अंदाज निवडणूक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.