Karnataka Assembly Election 2018: मित्राचा शत्रू आणि शत्रूचा मित्र होतो तेव्हा....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 01:09 PM2018-04-24T13:09:46+5:302018-04-24T13:09:46+5:30
काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सिद्धरामय्या यांना खरे आव्हान त्यांच्याच मतदारसंघात जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवाराचे आहे. ही व्यक्ती म्हणजे त्यांचेच एकेकाळचे सहकारी जी. टी देवेगौडा.
बेंगळुरू- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये दिवसेंदिवस नव्या घटना घडत आहेत तर काही आगामी घटनांची नांदी आताच स्पष्टपणे दिसू लागली आहे. एकेकाळी जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे महत्त्वाचे नेते असणारे सिद्धरामय्या आता पुरेपूर काँग्रेसवासी झाले असले तरी त्यांच्यासमोरील काही आव्हाने आजही कायम आहेत. काँग्रेसच्या या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारास भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असणाऱ्या बी. एस. येडीयुरप्पा यांच्या तुलनेत जास्त अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे.
येडीयुरप्पा १९८३ पासून शिकारपूर मतदारसंघातून निवडून जात होते. १९९९ साली त्यांना काँग्रेसच्या महालिंगाप्पा यांनी पराभूत केले, मात्र आज हेच महालिंगाप्पा त्यांचे निवडणूक व्यवस्थापक आहेत. येडीयुरप्पा यांना तीनदा आव्हान देणारे के. शेखरप्पा हेही येडीयुरप्पा यांच्यासाठीच प्रचाराला उतरले आहेत. २०१३ साली काँग्रेसच्या एच.एस. शांतविरप्पा गौडा यांनी येडीयुरप्पा यांना सळो की पळो करुन सोडले होते, ही निवडणूक येडीयुरप्पा यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची व आव्हानात्मक करण्यात त्यांचा मोठा वाटा होता, आता ते येडीयुरप्पांच्या बाजूने आहेत. २०१३ सालीच जनता दल धर्मनिरपेक्षतर्फे येडीयुरप्पा यांच्याविरोधात लढणारे बी. डी. भूकनाथ त्यांच्याच गोटात सामील झाले आहेत.
मैसूरमधील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघात २००६ साली झालेल्या पोटनिवडणुकीत सिद्धरामय्या यांच्याबाजूने व्ही. श्रीनिवास प्रसाद आणि एच. विश्वनाथ मदतीसाठी होते. आज श्रीनिवास प्रसाद भाजपात गेले आहेत तर विश्वनाथ यांनी जनता दल धर्मनिरपेक्षमध्ये प्रवेश केला आहे. हे महत्त्वाचे वरिष्ठ मित्र इतर पक्षांमध्ये गेले असले तरी नंजनगुंड आणि गुंडलुपेट येथे झालेल्या पोटनिवडणुका सिद्धरामय्या यांनी स्वतःच्या करिष्म्यावर काँग्रेसला निवडून दिल्याचे सांगितले जाते. पण त्यांना खरे आव्हान त्यांच्याच मतदारसंघात जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवाराचे आहे. ही व्यक्ती म्हणजे त्यांचेच एकेकाळचे सहकारी जी. टी देवेगौडा. यामुळे सिद्धरामय्या यांना काँग्रेसच्या इतर जागांवरील प्रचारापेक्षा आपल्या मतदारसंघासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आणि एकेकाळच्या विरोधकांना आपल्या काफिल्यात सामावून घेणाऱ्या येडीयुरप्पा यांना मतदारसंघाबाहेर जाण्यास जास्त वेळ मिळणार असे निवडणूक अभ्यासक सांगत आहेत.