Karnataka Election: महिलांना मंगळसूत्र, स्मार्टफोन मोफत, १ टक्क्याने कर्ज; भाजपाची घोषणांची खैरात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 11:33 AM2018-05-04T11:33:54+5:302018-05-04T11:33:54+5:30
कर्नाटक विधानसभेसाठी अवघा आठवडा शिल्लक असताना, भारतीय जनता पार्टीने आपला जाहीरनामा प्रकाशित केला असून आश्वासनांचा पाऊस पाडलाय.
बेंगळुरूः कर्नाटक विधानसभेसाठी अवघा आठवडा शिल्लक आहे. 'स्टार प्रचारक' रिंगणात उतरलेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण तापलंय. सगळेच पक्ष घोषणांचा पाऊस पाडत असताना, भारतीय जनता पार्टीने आज आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय आणि आश्वासनांची खिरापत वाटलीय. गरीब जनता, नारीशक्ती आणि बळीराजाला डोळ्यापुढे ठेवून हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. त्यात गरीब महिलांना मोफत मंगळसूत्र आणि स्मार्टफोन देण्याची घोषणा करण्यात आलीय, तर दुष्काळग्रस्त भागांतील २० लाख शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची मदत देण्याचंही आश्वासन देण्यात आलंय.
भाजपाच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्देः
>> महिलांना २ लाखांपर्यंतचं कर्ज फक्त १ टक्का व्याजाने देणार
>> दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सर्व महिलांना मोफत स्मार्टफोन
>> दुष्काळग्रस्त भागातील २० लाख शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची मदत
>> शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दहा तास मोफत वीज
>> सिंचन योजनेसाठी दीड लाख कोटी रुपये
>> दारिद्र्य रेषेखालील महिलांना लग्नाच्या वेळी ३ ग्रॅमचं मंगळसूत्र मोफत
>> ३०० हून अधिक अन्नपूर्णा कँटीन
>> महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण राज्यांत सीसीटीव्ही कॅमेरे
>> काँग्रेस सरकारविरोधात श्वेतपत्रिका
>> महिलांना एक रुपयांत सॅनिटरी नॅपकीन
>> दारिद्र्य रेषेखालील महिला-मुलींना मोफत नॅपकीन
>> महिलांच्या उन्नतीसाठी १० हजार कोटींचा निधी
>> भूमिहीन शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांची विमा योजना
>> अनुसूचित जमातीच्या ४०० मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवणार
>> २४x७ भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन
>> प्रत्येक तालुक्यात रनिंग ट्रॅक आणि स्वीमिंग पूल
Bengaluru: BJP's CM candidate BS Yeddyurappa, Union Minister Prakash Javadekar & other leaders launch the party's manifesto for #KarnatakaElections2018pic.twitter.com/LLCxlB3CTm
— ANI (@ANI) May 4, 2018
दरम्यान, काँग्रेसने गेल्या आठवड्यातच आपला जाहीरनामा प्रकाशित केला. ५ वर्षांत कर्नाटकातील एक कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे. १८ ते २३ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना स्मार्टफोन देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे
- मुलींसाठी मोफत पदव्युत्तर शिक्षण
- शहरी भागात स्वस्त घरं बांधण्यासाठी समिती
- शहरांतील झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी समिती
- वाहतूक व्यवस्थेत सुधारणा
- अल्पसंख्यकांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा वाढवणार
- प्रत्येक घराला पिण्याचं पाणी पुरवणार
येत्या १२ मे रोजी कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान होणार असून १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे.