Karnataka Assembly Election 2018- या गावात एक, दोन नव्हे, तब्बल 30 सिद्धरामय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 09:04 AM2018-04-26T09:04:58+5:302018-04-26T09:04:58+5:30
कर्नाटकातील एका गावात एक, दोन नव्हे, तर जवळपास 30 मुलांचं नाव सिद्धरामय्या ठेवण्यात आलं आहे.
बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचारात दिवसेंदिवस रंगत भरत आहे. राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या निवडणुकीच्या रणसंग्रामात लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदीही उडी घेणार आहेत. परंतु या निवडणुकीत कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची जास्त चर्चा आहे. सिद्धरामय्या वारंवार भाजपावर हल्ला चढवताना पाहायला मिळतात. तर भाजपाच्याही रडारवर तेच आहेत. याच दरम्यान सिद्धरामय्या यांच्याबाबत एक उत्सुकता ताणणारी गोष्ट समोर आली आहे.
कर्नाटकातील एका गावात एक, दोन नव्हे, तर जवळपास 30 मुलांचं नाव सिद्धरामय्या ठेवण्यात आलं आहे. कर्नाटकातील सिद्धरामागुडी गाव हे सिद्धरामय्या यांचं गाव आहे. या गावात बरीच सिद्धरामय्या नावाचीच मुलं आहेत. कधी कधी असाही योग येतो की जर क्रिकेट टीम तयार करायची असेल तर 11 खेळाडू हे सिद्धरामय्या नावाचेच असतात. सिद्धरामय्या यांनी गाव सोडल्यानंतर राज्यातील सर्वोच्च पदावर ते विराजमान झाले. तेव्हापासून या गावातील काही माणसे स्वतःच्या मुलांना सिद्धरामय्या नाव देण्यासाठी उत्सुक असतात. 5 वर्षांच्या सिद्धरामय्या नावाच्या मुलाला जेव्हा तो व्हीआयपी होणार का, असा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला, मी स्वतःला असंच काहीसं समजत आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या चामुंडेश्वरी विधानसभा जागेवरून निवडणूक लढवत आहेत. या विधानसभा क्षेत्रातच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं गाव आहे. याशिवाय ते बदामी या मतदारसंघातूनही लढणार आहेत. कर्नाटक विधानसभेची मुदत 28 मे रोजी संपत आहे. 12 मे रोजी नव्या विधानसभेसाठी मतदान होईल आणि 15 मे रोजी निकाल जाहीर झाल्यावर नव्या सरकारची स्थापना होण्यासाठी प्रयत्न सुरू होतील. कर्नाटक विधानसभेत एकूण 224 जागा असून त्यातील 178 जागा सर्वसाधारण वर्गासाठी, 36 जागा अनुसूचित जाती गटासाठी तर 15 जागा अनुसूचित जमाती गटासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मावळत्या विधानसभेत सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील काँग्रेसला 122 जागा मिळाल्या होत्या.