Karunanidhi Death Update : करुणानिधी : प्रभावी वक्ता, लेखक, कवी, पत्रकार आणि नेताही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 04:31 AM2018-08-08T04:31:59+5:302018-08-08T04:33:27+5:30

आपल्या सर्वांनाच इतरांना लेबले चिकटवण्याची जणू सवयच झालेली असते.

Karunanidhi Death Update: Karunanidhi: Effective Speaker, Writer, Poet, Journalist and Leader | Karunanidhi Death Update : करुणानिधी : प्रभावी वक्ता, लेखक, कवी, पत्रकार आणि नेताही

Karunanidhi Death Update : करुणानिधी : प्रभावी वक्ता, लेखक, कवी, पत्रकार आणि नेताही

googlenewsNext

- संजीव साबडे
आपल्या सर्वांनाच इतरांना लेबले चिकटवण्याची जणू सवयच झालेली असते. एखाद्या व्यक्तीचे चांगले काम न पाहता, केवळ त्याच्यातील कमतरता पाहून त्याच्यावर शिक्के मारले जातात. अलीकडील काळात करुणानिधींच्या बाबतीतही असेच घडले. कलानिधी व दयानिधी मारन, मुलगी कणिमोळी, माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांच्या भ्रष्टाचाराचे सारे वार स्वत:वर घेण्याच्या प्रवृत्तीमुळे ते काहीसे बदनाम झाले. मुलगा स्टॅलिन यांची मग्रुरी व अळगिरी यांनी ठिकठिकाणी गोळा केलेल्या जमिनी हे सारे त्यांना दिसत नव्हते, असे नव्हे. पण हे सारे घडत असताना, त्यांनी वयाची ८५ गाठली होती आणि आपण यावर नियंत्रण आणू शकत नाही, हे ते कळून चुकले होते. हे प्रकार पाहण्याखेरीज त्यांच्याकडे पर्यायच नव्हता.
मात्र त्यामुळे भ्रष्ट नेत्यांच्या मागे ठामपणे उभा राहणारा नेता अशी त्यांची अलीकडील प्रतिमा बनत गेली. रामस्वामी नायकार व अण्णादुराई यांचा वारसदार अशी त्यांची ओळख संपत गेली. तामिळ वाघांना मदत करणारा नेता असा शिक्का तर आधी बसला होताच. त्यात त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी नसला तरी त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे इमलेच बांधले. पण सोबतच्या कार्यकर्त्याला, नेत्याला दूर जाऊ द्यायचे नाही, अशा धोरणातून त्यांनी त्याकडे डोळेझाकही केली. मुलगी कणिमोळी, स्टॅलिन व अळगिरी यांनाच ते नियंत्रणात ठेवू शकले नाहीत, तर इतरांचे काय?
पण असे असूनही गेली दोन वर्षे अतिशय आजारी असलेल्या करुणानिधी यांची लोकप्रियता अजिबात कमी झाली नव्हती. केवळ त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर रोज गर्दी होत असे. तब्येत बरी असली की त्यांना व्हीलचेअरवरून बाहेर आणले जाई. आपल्या समर्थकांना हात करून ते पुन्हा आत जात. ते तब्बल १३ वेळा विधानसभेवर निवडून आले. तीन वेगवेगळ्या मतदारसंघांतून त्यांनी या निवडणुका लढविल्या आणि एकदाही ते पराभूत झाले नाहीत. हा एक विक्रमच म्हणता येईल. ते १९६९ ते २0११ या काळात पाच वेळा मुख्यमंत्री झाले. तामिळनाडूमध्ये विरोधी सरकार फक्त तामिळनाडूचे होते.
आपण द्रविडी चळवळीचे, तामिळ जनतेचे प्रतिनिधी आहोत, हे तामिळनाडूबाहेरही त्यांनी पटवून दिले. कायम पांढरा सदरा व लुंगी, डोळ्यावर काळा चश्मा आणि अंगावर उपरणे असा त्यांचा वेष असे. कदाचित ते त्यांचे स्टाइल स्टेटमेंटही म्हणता येईल. त्यामुळे आजही बहुसंख्य तामिळ नेते अशीच वेषभूषा करतात. ते पूर्णपणे हिंदीविरोधी होते आणि कमी शिकल्यामुळे इंग्रजी त्यांना येत नव्हती. पण राष्ट्रीय राजकारणात स्वत:चा ठसा उमटवण्यात त्यामुळे त्यांना अजिबात अडचण आली नाही. ते कधी दिल्लीच्या सत्तेत गेले नाहीत. पण अनेकदा दिल्लीच्या सत्ताधाºयांना त्यांच्यावर अवलंबून राहावे लागले.
राज्यातील काँग्रेस संपविण्यात करुणानिधी यांचा मोठा वाटा होता. हे त्यांनी केले, जेव्हा एमजीआर पूर्णपणे राजकारणात सक्रिय नव्हते. जयललिता तर नव्हत्याच आणि शिवाजी गणेशनसारखा लोकप्रिय अभिनेता काँग्रेसमध्ये असतानाही त्याचा प्रभाव करुणानिधी यांनी तामिळ राजकारणावर पडणार नाही, याची दक्षता घेतली. त्यांनी सुमारे ४0 चित्रपटांसाठी कथा वा पटकथा लिहिल्या. त्यांची पटकथा असलेला अखेरचा चित्रपट २0११ साली प्रदर्शित झाला. याखेरीज असंख्य कथा, कादंबºया, कविता, अनेक चरित्रे, नाटके, ऐतिहासिक कथा त्यांच्या नावावर आहेत. द्रमुकचे मुरासोली हे मुखपत्रही त्यांनीच सुरू केले.
वयाच्या शाळेत असतानाच विद्यार्थी नेते बनले. जस्टिस पार्टीचे नेते अळगिरीस्वामी यांच्या भाषणाने प्रभावित झालेल्या करुणानिधी यांनी आधी हिंदीविरोधाला सुरुवात केली. त्यानंतर ते द्रमुकचे नेते झाले. तामिळनाडूतील कल्लागुडी या औद्योगिक गावात दालमिया यांचा उद्योग उभा राहणार असल्याने त्या रेल्वे स्थानकालाच दालमियापूरम असे नाव देण्यात आले. त्याविरोधात त्यांनी १४ व्या वर्षी यशस्वी आंदोलन केले. तामिळ अस्मिता कायम ठेवण्याचा हा प्रकार होता. तेव्हापासून लोकप्रिय झालेल्या या प्रभावी वक्ता असलेल्या या नेत्यामागे अखेरपर्यंत लोकांची गर्दी पाहायला मिळाली.

Web Title: Karunanidhi Death Update: Karunanidhi: Effective Speaker, Writer, Poet, Journalist and Leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.