काश्मीर समस्येवर मोदी म्हणाले, 'गाली से ना गोली से, परिवर्तन होगा कश्मिरी को गले लगाने से'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 11:38 AM2017-08-15T11:38:33+5:302017-08-15T13:42:27+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करताना काश्मीर समस्येचाही मुद्दा उपस्थित केला.
नवी दिल्ली, दि. 15 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करताना काश्मीर समस्येचाही मुद्दा उपस्थित केला. 'दहशतवाद्यांविरोधात कोणतीही नरमाईची भूमिका स्वीकारणार नाही. काश्मीरमध्ये जे काही होत आहे त्याबाबत बोलताना मोदी म्हणाले की, 'गाली से ना गोली से', 'परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से', अशी भूमिका मोदींनी काश्मीरबाबत मांडली.
गोळीबार हा काश्मीर समस्येवर उपाय नाही, असे यावेळी मोदींनी सांगितले. जम्मू काश्मीरचा विकास, सामान्य नागरिकांची स्वप्नं पूर्ण करण्याचा संकल्प आहे. शिवाय, दहशतवादाविरोधात जगातील अनेक देशांची भारताला मदत असल्याचेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आणखी बातम्या वाचा
(#IndependenceDay - मोदींनी केलं आतापर्यंतचं सर्वात छोटं भाषण)
(लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला 'न्यू इंडिया'चा नारा)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलेले भाषण चार वर्षातील सर्वात छोटं भाषण होतं. पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात' मध्ये बोलताना स्वातंत्र्यदिनाची भाषणं खूप मोठी असल्याची तक्रार करणारी पत्रं मिळाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर जुलै महिन्यात 'मन की बात'मध्ये बोलताना यावेळी स्वातंत्र्यदिनी होणारं भाषण छोटं असेल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्यानुसार मोदींनी थोडक्यात भाषण आटोपतं घेतलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी 54 मिनिटं भाषण केलं. 2014 मध्ये पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतरच हे त्यांचं सर्वात छोटं भाषण होतं. 2014 मध्ये 65 मिनिटं, 2015 मध्ये 86 मिनिटं आणि 2016 मध्ये 94 मिनिटांचं भाषण मोदींनी केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लाल किल्ल्यावरुन सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या या शुभप्रसंगी देशवासियांना कोटी-कोटी शुभेच्छा. संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचाही उत्सव साजरा करत आहे. सुदर्शन चक्राधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिलं, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वाकोटी देशवासियांतर्फे नमन करतो, असेही उद्गार यावेळी पंतप्रधान मोदींनी काढले.
विकासाच्या शर्यतीत आपण सर्व एकत्रितरित्या पुढे जाण्यासाठी काम करुया. जीएसटीमुळे देशाची कार्यक्षमता 30 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डिजिटल देवाण-घेवाणीत 34 टक्के वाढ झाली आहे. जीएसटीमुळे वेळेसोबतच हजारो कोटीही वाचले आहेत. देशाला ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र असे करत असताना गती कमी होऊ देणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले. हा देश बुद्धांचा आहे, गांधीचा आहे, येथे आस्थेच्या नावाखाली होणारा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कट्टरतावाद्यांना खडसावले आहे.
सरकारमध्ये डाळ खरेदी करण्याची प्रथा कधीच नव्हती,यावर्षी 16 लाख टन डाळ खरेदी केली. सरकारनं शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं आणि 16 लाख टन डाळ खरेदी करुन इतिहास रचला असंही मोदींनी सांगितलं आहे.