Kerala Floods; 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे', Paytm च्या मालकास नेटीझन्सने सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 03:17 PM2018-08-19T15:17:30+5:302018-08-19T15:23:10+5:30
Kerala Floods; केरळमध्ये पुरानं अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात आत्तापर्यंत 350 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वरुणराजाला थांबण्यासाठी प्रार्थना केली जात असून देशभरातून केरळसाठी मदत पाठविण्यात येत आहे.
मुंबई - केरळमध्ये पुरानं अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात आत्तापर्यंत 350 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे पाऊस थांबण्यासाठी वरुणराजाला प्रार्थना केली जात आहे, तर दुसरीकडे देशभरातून केरळसाठी मदत पाठविण्यात येत आहे. या कामात दानशूर व्यक्तीही आपले कर्तव्य समजून पुढे येत आहेत. मात्र, पेटीएम कंपनीचे मालक विजय शेखर शर्मा यांनी केरळच्या जनतेची खिल्ली उडविण्याचाच प्रयत्न केला आहे. जवळपास 12 हजार कोटींचे मालक असलेल्या शेखर यांनी 10 हजार रुपयांची तुटपूंजी मदत केरळसाठी दिली आहे. विशेष म्हणजे पेटीएमद्वारे ही मदत देताना त्यांनी मदतीसाठी लोकांना पेटीएमचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आपल्या ब्रँडची जाहिरात करताना त्यांनी खालची पातळी गाठल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.
केरळमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. केंद्र सरकारने केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर केली असून इतर राज्यांनीही आपापल्यापरीने मदत दिली आहे. महाराष्ट्र सरकारने 20 कोटींची मदत दिली. तर राज्यातील काँग्रेस आमदार आणि खासदारांनी एक महिन्याचा पगार मदत म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. तसेच इतर राज्यातील इतर राजकीय पक्षांतील नगरसेवक ते खासदार सर्वच मदतीसाठी सरसावले आहेत. सहकारी संस्था, उद्योजक आणि व्यक्तींकडूनही केरळला मदत करण्यात येत आहे. मात्र, पेटीएमचे संस्थापक आणि देशातील मोठे उद्योजक असलेल्या विजय शेखर शर्मा यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून 10 हजार रुपये दिले आहेत. विशेष म्हणजे ही मदत त्यांनी पेटीएमच्या माध्यमातून केली असून लोकांनीही पेटीएमचा वापर करुन मदत करावी, असे आवाहनही केले आहे. म्हणजेच, एकप्रकारे विजय शेखर यांनी केवळ 10 हजार रुपयांत स्वत:च्या कंपनीची लाखो रुपयांची जाहिरातच केली आहे. शर्मा यांनी केरळसाठी 10 हजार रुपये मदत केल्याचा स्क्रीनशॉटही ट्विटरवरुन शेअर केला. त्यानंतर, विजय शेखर यांनी नेटीझन्सने चांगलेच सुनावले आहे. 12 हजार कोटींची संपत्ती असलेल्या शर्मा यांनी केलेली तुटपूंजी मदत म्हणजे केरळवासियांची चेष्टाच असल्याचे युजर्संने म्हटले आहे. विशेष म्हणजे केवळ 48 तासांतच 4 लाख पेटीएम युजर्संने केरळसाठी पेटीएमद्वारे 10 कोटींचा निधी जमा केला आहे. मात्र, विजय शेखर यांनी 10 हजार दिल्याने युजर्सं चांगलेच खवळले आहेत. विजय शेखर तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुमच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी एका आपत्कालीन घटनेचे सहाय्य घेणे अतिशय खालच्या स्तराचे काम असल्याचे हिमिका चौधरी नावाच्या युजर्सने म्हटले आहे. तर अनेक युजर्संनेही तशाच भाषेत विजय शेखर यांना सुनावले आहे. आमच्याकडे गणपतीची पट्टीही जास्त दिली जाते, तुम्ही अब्जाधीश असून केवळ 10 हजार रुपये देता, असेही नेटीझन्सने सुनावले आहे.
Oh hell!!! This is the lowest low, using a calamity to gain mileage for his brand. @vijayshekhar Shame on you.
— Himika Chaudhuri (@himikac) August 18, 2018
दरम्यान, केरळमध्ये शुक्रवार आणि शनिवारी पाऊस कमी झाल्यानं 14 जिल्ह्यांना दिलेला रेड अलर्ट हटवण्यात आला होता. मात्र, 9 ऑगस्टनंतर पहिल्यांदाच हा रेड अलर्ट हटवण्यात आला आहे. पाऊस ओसरल्यानं बचावकार्याला वेग आला आहे. सरकार आणि एनडीआरएफची टीम मिळून बचावकार्य राबवत आहेत. एर्नाकुलम, पथनमथिट्टा आणि अलप्पुझा जिल्ह्यांतील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुसळधार पावसानं आलेल्या पुरात आतापर्यंत 350 जणांचा मृत्यू झाला आहे.