राहुल गांधींचे मिशन साऊथ; वायनाडमधून आज उमेदवारी अर्ज भरणार, प्रियंकासोबत भव्य रोड शो
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 08:52 AM2019-04-04T08:52:59+5:302019-04-04T08:58:23+5:30
राहुल गांधी आज वायनाड मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दोन मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. उत्तर प्रदेशातील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातीलवायनाड या दोन मतदार संघातून राहुल गांधी आपले नशीब आजमावणार आहेत.
राहुल गांधी आज वायनाड मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी उपस्थित असणार आहेत. तसेच, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वायनाडमध्ये काँग्रेसने रॅलीचे आयोजन केले आहे. याशिवाय, देशातील 22 शहरांमध्ये काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यावर पत्रकार परिषद घेणार आहे.
राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यापासून हा मतदारसंघ देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. राहुल गांधीच्या उमेदवारीवरून संतापलेल्या डाव्यांनी त्यांना पराभूत करण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्षांचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे काँग्रेसने डाव्या पक्षांविरोधात पुकारलेली लढाई असल्याची टीका सीपीएम केली आहे. तसेच, सीपीएमच्या मुखपत्राने राहुल गांधींचा उल्लेख 'पप्पू' असा केला आहे. देशाभिमानी या सीपीएमच्या मुखपत्राने राहुल गांधींचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे 'पप्पू स्ट्राइक' असल्याचे म्हटले आहे.
(ही तर 'पप्पू स्ट्राइक'; वायनाडवरून डाव्यांचा राहुल गांधींना टोला)
याशिवाय, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएनेही राहुल गांधी यांच्याविरोधात वायनाडमधील आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. वायनाडमधून एनडीएचा घटकपक्ष असलेल्या भारत धर्म जनसेना (बीडीजेएस) चे अध्यक्ष तुषार वेल्लापल्ली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
(वायनाडमध्ये राहुल गांधींविरोधात एनडीएचा उमेदवार ठरला, अमित शहांनी केली घोषणा)