दिल्लीत भाजपसमोर कठीण टास्क; काँग्रेस-आप आघाडीनंतर मतांचे पारडे फिरले तरी पराभवाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2024 07:20 AM2024-05-16T07:20:06+5:302024-05-16T07:20:56+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका झाल्याने इंडिया आघाडीच्या भात्यात नवा बाण आला आहे केजरीवालांनी विरोधकांना शिंगावर घेणे सुरू केले आहे.
हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २५ मे रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये दिल्लीतील लोकसभेच्या सातपैकी कोणतीही जागा जिंकण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांना (काँग्रेस-आप) ५ ते ११ टक्के मते त्यांच्या बाजूने झुकली तरी पुरेसे आहे, अशी परिस्थिती आहे. येथे २५ मे रोजी मतदान होणार आहे. ‘इंडिया’ आघाडीला विजय मिळवण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आप यांचा संयुक्त प्रचारही आवश्यक ठरणार आहे.
काँग्रेस तीन आणि ‘आप’ चार जागा लढवित आहेत. २०१४ पासून सातही मतदारसंघात ५३% ते ६०% मते मिळवून सर्व सात जागा जिंकणाऱ्या भाजपकडून लोकसभेच्या दोन-तीन जागा हिसकावून घेण्याची शक्यता वाढली आहे. परंतु दोन्ही पक्षांनी अद्याप प्रचाराची संयुक्त मोहीम आखली नाही. २०२४ मध्ये आप-काँग्रेसची आघाडी झाल्यामुळे काही उमेदवारांच्या विजयाची शक्यता वाढली आहे.
कुठे कसे फिरू शकताे निकाल...
पूर्व दिल्लीत भाजपचे मनोज तिवारी यांना ५३.९० टक्के तर काँग्रेस आणि आप उमेदवाराला ४२ टक्के मतदान झाले होते. भाजपला पराभूत करण्यासाठी आघाडीला ७ टक्के मते बाजूला झुकणे गरजेचे आहे.
नवी दिल्ली मतदारसंघात सुषमा स्वराज यांची कन्या बन्सुरी स्वराज ‘आप’च्या सोमनाथ भारती यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात आहेत. तेथेही आप-काँग्रेस आघाडीला गेल्या निवडणुकीत ४९ टक्के मिळाली हाेती. त्यामुळै विजयासाठी फक्त ५ टक्के मते झुकल्यास बांसुरी यांचा विजय अवघड हाेऊ शकताे.
चांदनी चौक जागा भाजपचे उमेदवार प्रवीण खंडेलवाल यांच्यासाठी असुरक्षित बनली आहे. जिथे त्यांचे पूर्ववर्ती डॉ. हर्षवर्धन यांना ५३ टक्के मते मिळाली होती, तर काँग्रेस आणि आप उमेदवारांना मिळून ४४ टक्के मते मिळाली होती आणि भाजपचा पराभव करण्यासाठी केवळ ५ टक्के मते त्यांच्या बाजूने झुकणे गरजेचे आहे.
२०१९ मध्ये सर्व ७ जागा जिंकल्या
भाजपने २०१९ मध्ये लोकसभेच्या सातही जागा मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या. सर्व ७ जागांवर भाजप उमेदवारांना एकूण मतदानाच्या ५३ ते ६० टक्के मते मिळाली. २००९ मध्ये काँग्रेसने सर्व सात जिंकल्या होत्या.
केजरीवाल यांच्या टीकेला धार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका झाल्याने आघाडीच्या भात्यात नवा बाण आला आहे केजरीवालांनी विरोधकांना शिंगावर घेणे सुरू केले आहे. आप-काँग्रेसची आघाडी झाली असताना गोरगरीब, महिला आणि इतरांना मोफतच्या अनेक गोष्टी दिल्याने केजरीवाल यांची लोकप्रियता साहाय्यक ठरू शकते. राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका यांच्याकडे काँग्रेसची शेवटची आशा म्हणून पाहिले जात आहे.