ममता बॅनर्जींनी दिली ईव्हीएम विरोधात आंदोलनाची हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 09:45 AM2019-06-04T09:45:51+5:302019-06-04T09:55:36+5:30
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवर ममता यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
कोलकाता - तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवर ममता यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. तसेच मतदान बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच घेतलं जावं याची मागणी लावून धरण्याचं आवाहन ममता यांनी इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही केलं आहे.
ममता यांनी ईव्हीएम मशीनसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांचा तपास करण्यासाठी 'फॅक्ट-फाइंडिंग' समितीची स्थापन करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (3 जून) पक्षाचे आमदार आणि राज्यातील मंत्र्यांची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.
'आम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची आहे. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर केला जाणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही आंदोलन करणार असून त्याची सुरुवात पश्चिम बंगालमधून होईल' असं ममता यांनी पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. तसेच भाजपाने 23 जागांचा दावा केला होता, पण त्यांनी 18 जागा जिंकल्या आहेत. मतदानाची टक्केवारी पाहता यंदा तृणमूलला मिळालेल्या मतांचं प्रमाण 4 टक्क्यांनी वाढलं असल्याचं ममतांनी म्हटलं आहे.
भाजपाच्या ‘जय श्रीराम’ नाऱ्याला ममता बॅनर्जींचे ‘जय हिंद’ने उत्तर
भाजपा कार्यकर्त्यांच्या ‘जय श्रीराम’च्या घोषणेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच तृणमूल काँग्रेसने ‘जय हिंद’ने उत्तर द्यायचे ठरविले आहे. त्याची सुरुवात ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटरवर हँडल व फेसबुकवरील डिस्प्ले प्रोफाईलवरही (डीपी) तो नारा दिला आहे. तृणमूलच्या अनेक नेत्यांनीही लगेच त्यांचे अनुकरण केले आहे. ममता बॅनर्जी यांच्या नव्या डीपीवर जय हिंद, जय बांगला ही घोषणा लिहिली आहे. त्याशिवाय महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन राय, रवींद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ईश्वरचंद्र विद्यासागर, मातंगिनी हाजरा व काझी नजरुल इस्लाम यांची छायाचित्रेही त्या डीपीमध्ये आहेत.
...जेव्हा ममता बॅनर्जी भाजपच्या कार्यालयाचा घेतात ताबा
पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता थेट एकमेकांचे पक्ष कार्यालय त्याब्यात घेण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मारामारीवर उतरले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपाने आपले कार्यालय थाटले असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसकडून करण्यात येत आहे. शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी भाजपाचे कार्यालायचे कुलूप तोडून आपल्या त्याब्यात घेत, तिथे आपल्या पक्षाचे कार्यालय सुरू केलं. भाजपच्या कार्यालयवरील भाजपाचे चिन्ह आणि भगवा रंग मिटवण्याचे आदेश दिले. त्यांनतर त्यांनी स्वतः आपल्या पक्षाचे चिन्ह काढत भाजपाच्या त्या कार्यालयाला आपल्या पक्षाचे नाव दिले