'नीच'नीती भोवली ! मणिशंकर अय्यर, कपिल सिब्बल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रेसचे नुकसान, वीरप्पा मोईलींचा घरचा अहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 11:52 AM2017-12-20T11:52:35+5:302017-12-20T12:09:53+5:30
मणिशंकर अय्यर आणि कपिल सिब्बल यांच्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी केले आहे.
नवी दिल्ली - मणिशंकर अय्यर आणि कपिल सिब्बल यांच्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी केले आहे. त्याचबरोबर अय्यर आणि सिब्बल यांच्या वक्तव्याचा अत्यंत खालच्या स्तराला जाऊन मोदींनी फायदा घेतल्याचा टोलाही वीरप्पा मोईल यांनी लगावला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा हा निसटता पराभव मणिशंकर अय्यर आणि कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यामुळे झाल्याचे बोलले जात आहे. या दोघांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे 22 वर्षांनंतर गुजरातच्या सत्तेवर येण्याचे काँग्रेसचे स्वप्न भंगले, असं म्हटले जात आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा व काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसले.
नरेंद्र मोदी एकदम 'नीच' आणि 'असभ्य' माणूस - मणिशंकर अय्यर
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदम नीच आणि असभ्य माणूस असल्याची टीका काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं उद्घाटन केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीका करत निशाणा साधला होता. काँग्रेसच्या एका कुटुंबाला वाढवण्यासाठी बाबसाहेब आंबेडकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना मणिशंकर अय्यर यांनी अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. त्यांनी मोदींना नीच आणि असभ्य असा उल्लेख केला. याआधी मणिशंकर अय्यर यांनी 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींना 'चायवाला' म्हटलं होतं.
#WATCH: "Ye aadmi bahut neech kisam ka aadmi hai, is mein koi sabhyata nahi hai, aur aise mauke par is kisam ki gandi rajniti karne ki kya avashyakta hai?: Congress' Mani Shankar Aiyar on PM Modi pic.twitter.com/sNXeo6a1Gi
— ANI (@ANI) December 7, 2017
पंतप्रधान मोदींनी वाचला काँग्रेसी नेत्यांच्या अपशब्दांचा पाढा
यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याविरोधात काढलेल्या अपशब्दांचा पाढा जाहीररित्या वाचत काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस मला शिव्याशाप देऊन थकत नाही, पण मी शांत राहतो, असे सांगत मोदींनी गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले होते की, काँग्रेसने मला पहिल्यांदा नीच म्हटलेले नाही. सोनिया गांधी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी याआधीही असे केले आहे. मी नीच का आहे? कारण मी गरीबाच्या घरी जन्माला आलोय. कारण माझी जात खालची आहे. कारण मी गुजराती आहे. हीच कारणे आहेत का माझा द्वेश करण्यासाठी."