अण्णा द्रमुकमध्ये मनोमिलन, पनीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्रिपद तथा पक्षाचे समन्वयक पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:07 AM2017-08-22T01:07:39+5:302017-08-22T01:08:26+5:30
अण्णा द्रमुकचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी व माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम गटांचे सोमवारी अखेर विलीनीकरण झाले असून, सरचिटणीस शशिकला यांना पदावरून व पक्षातून दूर करण्याबाबतही त्यांच्यात एकमत झाले आहे.
चेन्नई : अण्णा द्रमुकचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी व माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम गटांचे सोमवारी अखेर विलीनीकरण झाले असून, सरचिटणीस शशिकला यांना पदावरून व पक्षातून दूर करण्याबाबतही त्यांच्यात एकमत झाले आहे. समझोत्याचा भाग म्हणून पक्षाचे समन्वयक म्हणून पनीरसेल्वम यांना नेमण्यात आले असून, मुख्यमंत्री उपसमन्वयक असतील. त्यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही शपथविधी पार पडला.
पनीरसेल्वम यांच्याकडे अर्थ खात्याबरोबरच गृहनिर्माणाशी संबंधित चार खाती तसेच झोपडपट्टी पुनर्वसन आणि शहर नियोजन ही खाती देण्यात आली आहेत. त्यांचे विश्वासू के. पांडियराजन यांचाही शपथविधी पार पडला. याशिवाय पनीरसेल्वम गटाला आणखी मंत्रिपदे मिळणार आहेत.
माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांनी पक्षाचा ताबा घेतल्यामुळे आणि पनीरसेल्वम यांना दूर करून पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याने
पक्षात फूट पडली होती. पण आता त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना
पक्षात कोणतेही स्थान असणार नाही. (वृत्तसंस्था)
भाजपालाच अधिक आनंद
हे दोन गट एकत्र यावेत, यासाठी भाजपाने खूपच रस दाखवला. विलीनीकरण आजच व्हावे, यासाठीही भाजपाने दबाव आणला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी चेन्नईला जाण्यापूर्वी हे गट एकत्र यावेत, अशी भाजपाची इच्छा होती.
तसेच पनीरसेल्वम व पलानीस्वामी यांनी एकूण सहा वेळा पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. आजही दोन्ही गट एकत्र आल्यावर मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. तामिळनाडूमध्ये एकत्रित अण्णा द्रमुकशी समझोता करून ताकद वाढवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
तुरुंगवास पथ्यावर : शशिकला सरचिटणीस झाल्यानंतर काही काळातच त्यांना शिक्षा झाली. त्या सध्या तुरुंगात आहेत. त्यांचा तुरुंगवासच या दोन गटांना एकत्र येण्यास कारणीभूत ठरला आहे.
टीका व थट्टा : अन्य विरोधी पक्षांनी मात्र या विलीनीकरणाचे वर्णन संधीसाधू कृती असे केले आहे. द्रमुक, मार्क्सवादी कम्युनिस्ट तसेच अभिनेते कमल हासन यांनी दोन गटांच्या एकत्र येण्याची थट्टा उडवली आहे.
शशिकला यांची हकालपट्टी लवकरच
पक्षाच्या जनरल कौन्सिलची बैठक घेऊ न व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शशिकला यांची पद व पक्षातून हकालपट्टी केली जाईल आणि जयललिता यांच्या मृत्यूचीही चौकशी होईल, हे पलानीस्वामी यांनी जाहीरच केले आहे. त्यांचे भाचे दिनकरन यांना याआधीच पलानीस्वामी गटाने दूर केले आहे.
दिनकरन यांच्या
गटात १८ आमदार
चेन्नईमध्ये हे दोन गट एकत्र येत असतानाच दिनकरन यांच्यासह १८ आमदारांनी जयललिता यांच्या समाधीवर जाऊ न, पुष्पहार अर्पण केला. याचा अर्थ दिनकरन यांच्यासमवेत १८ आमदार असून, ते मूळ पक्षाबरोबर राहणार नाहीत. आर. के. नगर पोटनिवडणुकीत दिनकरन यांच्यातर्फे पैसेवाटप झाल्याने ती रद्द करण्यात आली होती. त्या वेळी दिनकरन यांचे समर्थक असलेल्या मंत्र्याच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापेही घातले होते.