भाजपापासून मायावती बसपाला दूर ठेवतील?

By admin | Published: February 18, 2017 01:42 AM2017-02-18T01:42:17+5:302017-02-18T01:42:17+5:30

बहुमत न मिळाल्यास बहुजन समाज पक्ष विरोधी बाकांवर बसेल, मात्र भाजपाबरोबर सरकार बनवणार नाही. खचलेल्या भाजपाने मुस्लीम समुदाय

Mayawati to keep the BSP away from BJP? | भाजपापासून मायावती बसपाला दूर ठेवतील?

भाजपापासून मायावती बसपाला दूर ठेवतील?

Next

सुरेश भटेवरा / लखनऊ (उत्तर प्रदेश)
बहुमत न मिळाल्यास बहुजन समाज पक्ष विरोधी बाकांवर बसेल, मात्र भाजपाबरोबर सरकार बनवणार नाही. खचलेल्या भाजपाने मुस्लीम समुदाय बसपापासून दूर राहावा, यासाठी सोशल मीडियाद्वारे खोटा प्रचार चालवला आहे. या अफवांवर अल्पसंख्य समाजाने विश्वास ठेवू नये... हे वक्तव्य आहे मायावतींचे.
मैदानावर हजारो समर्थकांची गर्दी होती. सभेसाठी लोक चालत आले होते. एका दिव्यांगाची गर्दीशी झटापट चालली होती. सभा संपताच त्याला विचारले, बहनजींच्या सभेबाबत कशाची उत्सुकता वाटते? तेव्हा तो म्हणाला, ‘मेरे जैसे लाखो लोगोंका नसीब बदलने की क्षमता बहनजी में हैं।’ सभा संपल्यावर लोक शांततेत परतले. त्यांच्या चेहऱ्यांवर विद्रोहाची झलक होती.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी बसपचा निळा झेंडा शहरी झोपडपट्ट्या व ग्रामीण भागातल्या कच्च्या घरांवर दिसायचा. आता पक्क्या घरांवर, खिडक्यांंवर, मुस्लीम मोहल्ल्यांमध्येही तो दिसतो. मोठमोठे होर्डिंग्ज, चमकदार प्रचारसाहित्य आणि मीडियाच्या झगमगाटापासून दूर, बसपचे कार्यकर्ते गल्लोगल्ली बहनजींसाठी मतांचा जोगवा मागतात. अगदी मीडियाच्या सहकार्याविना.
ब्राह्मण समाजाने गेल्या निवडणुकीत मायावतींची साथ सोडली. पण बसपामधे जाटवांचे वर्चस्व असल्याने कश्यप, पासी, मौर्य, धोबी, वाल्मिकी नेत्यांना महत्त्व न मिळाल्याने गैरजाटव नेतेही बसपापासून दूर गेले. भाजपाने हे हेरले आणि परंपरागत मतदारांसह दलित व ओबीसींचीही मोट बांधण्याचा प्रयत्न केला. तो कितपत यशस्वी ठरतो, हे निकालानंतर कळेल.
समाजवादी पक्षातला कलह शिगेला पोहोचल्यामुळे मुस्लीम समाज संभ्रमात होता. तेव्हा मुस्लीम-दलितांचे समीकरण साधून, मायावती सत्ता मिळवतील, असे बोलले जायचे. पण सपा व काँग्रेसला परिस्थितीने एकत्र आणल्याने सारे चित्रच बदलले. पश्चिमी उत्तर प्रदेशात मायावतींना गेल्या वेळी २४ जागा मिळाल्या. यंदा त्यात वाढ होईल, असा प्रचार भाजपाने केला. सपा व बसपामध्ये मुस्लिम मतदारांचे विभाजन व्हावे, असा तयामागील हेतू. भाजपाचा हा खेळ यशस्वी झाल्यास कोणालाच बहुमत नाही, अशी स्थिती होऊ शकते.
तिसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल. पण बसपाला भाजपपासून दूर ठेवण्याचा दिलेला शब्द मायावती अखेरपर्यंत पाळतील काय? इतकाच प्रश्न शिल्लक आहे.

Web Title: Mayawati to keep the BSP away from BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.