'पद्मावती वादात मोदी सरकारने लक्ष घालावं, नाहीतर सगळी थिएटर्स जाळून टाकू'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 04:49 PM2017-11-30T16:49:01+5:302017-11-30T21:04:25+5:30
पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने हस्तक्षेप केला नाही, तर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशभरातील सर्व चित्रपटगृह जाळून टाकतील अशी धमकी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी दिली आहे.
नवी दिल्ली - पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने हस्तक्षेप केला नाही, तर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशभरातील सर्व चित्रपटगृह जाळून टाकतील अशी धमकी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी दिली आहे. चित्रपटगृहच जाळून टाकले तर लोक कुठे आणि कसा चित्रपट पाहतील असंही त्यांनी म्हटलं आहे. हा कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न नसून हिंदू धर्मासंबंधीच्या आस्थेचा प्रश्न आहे असं त्यांनी सांगितलं आहे
पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी लोकसभेच्या एका समितीने सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांची भेट घेतली. यावेळी प्रसून जोशी यांनी अद्याप सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला नसल्याचं सांगितलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाने फक्त चित्रपटाचा ट्रेलर आणि प्रोमो रिलीज करण्याची परवानगी दिली असल्याचं प्रसून जोशींनी समितीला सांगितलं आहे. चित्रपट प्रदर्शित करण्याआधी तज्ञांना दाखवला जाईल अशी माहिती प्रसून जोशी यांनी समितीला दिली आहे. त्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतरच चित्रपट प्रदर्शित करण्याला परवानगी मिळणार आहे.
संजय लिला भन्साळी यांचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'पद्मावती' सिनेमा रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे. राजस्थानच्या करणी सेनेनं सिनेमाला तीव्र विरोध दर्शवत पद्मावती सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. वाढता विरोध पाहता सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान, सिनेमाला आतापर्यंत सेन्सॉर बोर्डकडूनही हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही. निर्मात्यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारीखदेखील जाहीर केलेली नाही. यामुळे सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या रसिकांची निराशा झाली आहे.
एकूणच पद्मावती सिनेमामागील वाद थांबता थांबत नाहीयत. मात्र, या सर्व वादाचा काही जण फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. पद्मावतीच्या नावावर बोगस व्हिडीओला सिनेमा असल्याचं सांगत यू-ट्युबवर अपलोड करण्यात येत आहे. हे व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. या बनावट व्हिडीओमुळे पद्मावती सिनेमा लीक झाल्याचे इंटरनेट युजर्संना वाटत आहे.
या बोगस व्हिडीओंमुळे पद्मावती सिनेमाची निगेटीव्ह पब्लिसिटी होत आहे. खरंतर पद्मावती सिनेमा अद्यापपर्यंत ऑनलाइन उपलब्ध झालेला नाही. दरम्यान, तरीही सिनेमा प्रदर्शनापूर्वीच लीक होऊ नये, यासाठी निर्मात्यांनी सावध राहायला हवं. यापूर्वी मोहल्ला अस्सी, ग्रेट ग्रँड मस्ती, उडता पंजाब आणि गोलमाल यासारखे सिनेमे प्रदर्शनापूर्वी लीक झाले होते.
सुप्रीम कोर्टाची नाराजी
मंत्री व मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तींच्या वक्तव्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांचे मन निष्कारण कलुषित होऊ शकते. त्यामुळे या मंडळींनी वाचाळपणा करण्याआधी कायद्याची चौकट आपल्यालाही लागू आहे, याचे भान ठेवायला हवे, अशी नाराजी व्यक्त करत सुप्रीम कोर्टाने पद्मावतीबद्दलची याचिका फेटाळली.
चित्रपटात राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन, शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.