रोजगारनिर्मितीतील अपयश दडवण्याचा मोदींचा प्रयत्न- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 03:37 AM2019-03-16T03:37:47+5:302019-03-16T07:13:34+5:30
'जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता धोक्यात'
नवी दिल्ली : रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यात आलेले घोर अपयश पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांपासून दडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला आहे.
राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाच्या आकडेवारीची फेरमांडणी व राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (एनएसएसओ)ची रोजगारासंदर्भातील आकडेवारी खुली न करणे या केंद्र सरकारच्या धोरणाबद्दल जगभरातील १०८ अर्थतज्ज्ञ व समाजशास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामध्ये राकेश बसंत, जेम्स बॉईस, एमिली ब्रेझा, सतीश देशपांडे, पॅट्रिक फ्रँकोइस, आर. रामकुमार, हेमा स्वामीनाथन, रोहित आझाद आदींचा समावेश आहे. देशातील संस्थांचे स्वातंत्र्य तसे सांख्यिकी संस्थांची प्रतिष्ठा जपली जावी, असे आवाहन या नामवंतांनी केंद्र सरकारला केले होते. या अनुषंगाने राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा व विश्वासार्हतेला मोदींच्या काळात जितके तडे गेले तितके त्याआधी कधीही घडले नव्हते. त्यामुळेच जगभरातील अर्थतज्ज्ञ व समाजशास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली असून सरकारनेही या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आकड्यांमध्ये फेरफार करून आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारला पराभूत करा, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे.
भारतातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारी २0१९ मध्ये वाढून ७.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबर २0१६ नंतरचा हा उच्चांक ठरला आहे. फेब्रुवारी २0१८ मध्ये बेरोजगारीचा दर ५.९ टक्के होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती दिलेली आहे.
सीएमआयईचे प्रमुख महेश व्यास यांनी सांगितले की, वास्तविक देशातील रोजगार मागणाऱ्यांची संख्या घटली आहे. सीएमआयईच्या अहवालानुसार, नोटाबंदीमुळे २0१८ मध्ये ११ दशलक्ष लोकांना रोजगार गमवावा लागला, तसेच जीएसटीमुळे लक्षावधी छोट्या व्यावसायिकांना फटका बसला.
‘आरोग्यरक्षण कायदा करू’
लोकसभा निवडणुकांसाठी तयार करण्यात येणाºया काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आरोग्यरक्षण कायदा मंजूर करण्याच्या आश्वासनाचा समावेश करण्यात येईल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. एका स्वयंसेवी संस्थेने रायपूर येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींसमोर ते बोलत होते.
प्रत्येकाला उत्तम उपचारांच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. एकूण राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाच्या ३% रक्कम आरोग्यसुविधांवर खर्च करण्याचा निर्णय काँग्रेस सत्तेवर आल्यास घेण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्याही वाढविली जाईल, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.