साधू-संत निवडणुकीच्या 'आखाड्यात'; अनेकांना भाजपाकडून हवं तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 02:42 PM2018-09-09T14:42:45+5:302018-09-09T14:44:40+5:30

भाजपानं तिकीट न दिल्यास अपक्ष लढण्याची तयारी सुरू

mp assembly election babas saints wants to contest election on bjp ticket | साधू-संत निवडणुकीच्या 'आखाड्यात'; अनेकांना भाजपाकडून हवं तिकीट

साधू-संत निवडणुकीच्या 'आखाड्यात'; अनेकांना भाजपाकडून हवं तिकीट

Next

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत अनेक साधू-संत आपलं नशीब आजमवण्याच्या तयारीत आहेत. मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारनं एप्रिलमध्ये पाच बाबांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता. यामुळे साधू-संतांमधील राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली असून आतापर्यंत आखाड्यात रमणाऱ्या बाबांनी राजकीय आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. 

आपल्या अनुयायांमध्ये कॉम्प्युटर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी नामदेव त्यागी यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी निवडणूक लढवण्यास उत्सुक आहे. मात्र मी भाजपावर तिकिटासाठी दबाव आणणार नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निवडणूक लढवण्यास सांगितल्यास मी तयार आहे, अशा शब्दांमध्ये कॉम्प्युटर बाबांनी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा व्यक्त केली. कॉम्प्युटर बाबांना इंदूरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं त्यांच्या एका अनुयायानं सांगितलं. कॉम्प्युटर बाबांनी नर्मदा नदीच्या तटांजवळ करण्यात आलेल्या वृक्षारोपणात घोटाळा झाल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी केला होता. याविरोधात त्यांनी नर्मदा घोटाळा रथ यात्रा काढण्याची तयारीदेखील सुरू केली होती. यानंतर त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळताच त्यांनी नर्मदा घोटाळा रथ यात्रा रद्द केली. 

रामचरित मानसमध्ये पदवी घेतलेल्या 47 वर्षांच्या बाबा अवधेशपुरी यांना उज्जैनमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. आपले विश्व हिंदू परिषद आणि संघाशी चांगले संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 'भाजपा व्हेंटिलेटरवर असल्यापासून मी पक्षासाठी काम करत आहे. तिकिटासाठी मी भाजपावर दबाव आणणार नाही. मी निवडणूक लढवावी, अशी माझ्या अनुयायांची इच्छा आहे. भाजपानं तिकीट न दिल्यास मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवेन,' असं बाबा अवधेशपुरी यांनी सांगितलं. 

संत मदन मोहन खडेश्वरी महाराज यांना सिवनी जिल्ह्यातील केवलारी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. 'माझा विजय निश्चित आहे. भाजपानं तिकीट न दिल्यास मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवेन. गेल्या 30 वर्षांपासून मी केवलारीमध्ये काम करत आहे,' असं खडेश्वरी महाराज यांनी म्हटलं. याशिवाय रायसेन जिल्ह्यातील रविनाथ महिवाले, बाबा महेंद्र प्रताप गिरी यांनाही भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवायची आहे. 
 

Web Title: mp assembly election babas saints wants to contest election on bjp ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.