एक वर्ष आधीच धावणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन - पियुष गोयल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 09:55 PM2017-09-11T21:55:27+5:302017-09-11T21:58:47+5:30
भारतात पहिली बुलेट ट्रेन 2023 मध्ये प्रत्यक्ष धावण्यासाठी लक्ष्य असलं तरी 15 ऑगस्ट 2022 म्हणजे 75 व्या स्वातंत्र्यदिनाला हे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे.
नवी दिल्ली, दि. 11 : भारतात पहिली बुलेट ट्रेन 2023 मध्ये प्रत्यक्ष धावण्यासाठी लक्ष्य असलं तरी 15 ऑगस्ट 2022 म्हणजे 75 व्या स्वातंत्र्यदिनाला हे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे. मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांना जोडणारी ही पहिली बुलेट ट्रेन असेल. मुंबईहून अहमदाबादला रेल्वेगाडीने जाण्यास सध्या (६५० किमी) सुमारे सात तास लागतात. बुलेट ट्रेनमुळे दोन तासाहून कमी वेळात अहमदाबाद गाठता येईल.
14 सप्टेंबरला अहमदाबादमध्ये देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचं भूमीपूजन होत आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत हे भूमीपूजन होणार आहे. या प्रकल्पासाठी जपानच्या जायका या संस्थेनं 88 हजार कोटींचं कर्ज दिलं असून, हे आजवर भारताला मिळालेलं सर्वात स्वस्त कर्ज असल्याचा दावा रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी केला. 0.1 टक्के दरानं हे कर्ज 50 वर्षाच्या मुदतीसाठी देण्यात आलं असून, हे कर्ज फेडण्याची सुरुवात 15 वर्षांनी होणार आहे.
अहमदाबाद-मुंबईसह देशभरातील बुलेट ट्रेन प्रकल्पांची उभारणी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड करीत आहे. अहमदाबाद-मुंबई प्रकल्पाच्या उभारणीसाठी जपानच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कॉर्पोरेशनला या प्रकल्पासाठी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील सुमारे एक हेक्टर जागा राज्य शासनाने देऊ केली आहे.
बुलेट ट्रेन पाण्याखालूनही धावणार
मुंबई ते अहमदाबाद ही बुलेट ट्रेन तब्बल २१ किलोमीटरचे अंतर समुद्रातून धावणार आहे. त्यामुळे समुद्रातून रेल्वेने प्रवास करण्याचा अनुभव लाखो भारतीयांना मिळणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गात २१ किलोमीटर अंतर समुद्रातील असून, तो भाग ठाण्याचा आहे. तिथे बुलेट ट्रेनसाठी समुद्रामध्ये बोगदे बांधण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे रेल्वेने ठरवले असले तरी तो प्रत्यक्षात कधी पूर्ण होईल, हे मात्र रेल्वेचे अधिकारी सांगू शकले नाहीत. याचे कारण प्रत्यक्ष काम सुरू व्हायलाच २0१८ साल उजाडेल, असे सांगण्यात येत आहे.