नरेंद्र मोदींमध्ये असुरक्षिततेची भावना, खोटेपणा त्यांच्या सरकारची ओळख - अरुण शौरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 13:02 IST2017-11-27T12:38:30+5:302017-11-27T13:02:06+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये मोठया प्रमाणावर असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयात मोठया प्रमाणावर अधिकारांचे केंद्रीकरण झाले आहे.

नरेंद्र मोदींमध्ये असुरक्षिततेची भावना, खोटेपणा त्यांच्या सरकारची ओळख - अरुण शौरी
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये मोठया प्रमाणावर असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयात मोठया प्रमाणावर अधिकारांचे केंद्रीकरण झाले आहे. मी आजच्या इतके कुठलेही पंतप्रधान कार्यालय कमकुवत पाहिलेले नाही अशा शब्दात प्रसिद्ध पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी मोदी सरकारवर टीका केली.
अरुण शौरी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. खोटेपणा ही मोदी सरकारची ओळख आहे. नोक-या निर्मिती आणि अन्य आघाडयांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे. नवी दिल्लीत आयोजित 'टाइम्स लिट फेस्ट'मध्ये ते बोलत होते. जी व्यक्ती मानसिक दृष्टया सुरक्षित आहे ती व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत निराश होणार नाही आणि ज्या व्यक्तीमध्ये असुरक्षिततेची भावना आहे अशी व्यक्ती जो तज्ञ आहे, ज्याला एखाद्या विषयातले कळते त्याला स्वत:च्या जवळ येऊ देणार नाही.
आज गाढव घोडे बनले आहेत आणि नेते ठरवू शकतात त्यांना कोणाबरोबर रहायच आहे असे शौरी म्हणाले. मोदी असुरक्षित असल्यामुळे पंतप्रधान कार्यालय कमकुवत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना स्वत:चा जनाधार नाहीय. त्यामुळे त्यांच्यापासून मोदींना काहीही धोका नाही असे शौरी म्हणाले. टीकेच्या बाबतीत मोदीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार अत्यंत संवेदनशील आहे असे शौरी म्हणाले. अरुण शौरी, यशवंत सिन्हा हे मोदी सरकारचे विरोधक समजले जातात. दोघांनी यापूर्वीही अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरुन मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.
मोदी सरकारची आर्थिक धोरणे दिशाहीन
दोनवर्षांपूर्वी एका मुलाखतीत नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली हे तिघेच आज भाजपा चालवत आहेत, अशी खरमरीत टीका त्यांनी केली होती. या तिघांनी वेळोवळी विरोधकांचा उपमर्द तर केलाच पण स्वपक्षीयांच्या मनातही भीती निर्माण केल्याचा आरोप शौरी यांनी केला होता. योग्य ती माहिती त्यांच्यापर्यंत पोचत नसल्याने आवश्यक तिथे बदल होत नाहीत, असे मत त्यांनी नोंदवले. तसेच मोदी सरकारची आर्थिक धोरणे दिशाहीन असल्याचेही त्यांनी म्हटले होते. सरकारचा कारभार काही बाबतीत चांगला असला तरी आर्थिक चित्र पालटण्याचे आश्वासन मात्र पाळण्यात आलेलं नाही, असही शौरी यांनी म्हटलं होतं.