'नरेंद्रभाई, जरा जास्त झोप घेत जा, 'बराक'नेही मला तेच सांगितले'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 10:23 AM2019-04-24T10:23:41+5:302019-04-24T10:23:47+5:30
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली.
नवी दिल्ली - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. या मुलाखतीवेळी अक्षयने मोदींच्या खासगी जीवनाविषयकही अनेक प्रश्नांची विचारणा केली. त्यावेळी, तुम्ही केवळ 3 ते 4 तास फक्त झोपता, पण शरीराला कमीत कमी 7 तासांची झोप हवीच ? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना मोदींनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओमाबा यांचा संदर्भ देत, तेही मला हेच सांगतात, असे मोदींनी म्हटले.
जेव्हा राष्ट्राध्यक्ष ओबामा मला भेटले तेव्हा त्यांनीही याच मुद्द्यावरून माझ्याशी वाद घातला. कारण, ते माझे चांगले मित्र आहेत. आम्ही दोघेही एकेमकांना आरे-तुरे करतो. मागे एकदा ओबामा मला भेटले तेव्हाही ते म्हणाले, माझं ऐकलं की नाही, झोपेची वेळ वाढवली की नाही. पूर्ण झोप घेत जा... असे ओबामी म्हणाले. त्यावेळीही मी हसलो. आता, माझ्या शरीराला 3 ते 4 तास झोपेची सवय झाली आहे. मात्र, कमी झोप झाल्यामुळे कुठलाही त्रास किंवा ताण माझ्या शरीरावर पडत नाही, असे मोदींनी म्हटले.
अक्षयनं मोदींना संन्यासी किंवा सोल्जर यापैकी काय बनायला आवडेल, असा प्रश्न विचारला, त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा कोणताही लष्कराचा अधिकारी युनिफॉर्ममध्ये जाताना दिसतो, तेव्हा लहान मुलांसारखा मीही त्याला सलाम करतो. इतकंच नव्हे 1962च्या युद्ध छेडलं गेलं होतं. तेव्हा देशासाठी प्राण देण्याचं मनोमन ठरवून टाकलं होतं. तेव्हाच मी वाचलं की गुजरातमधल्या सैनिक शाळेत प्रवेश सुरू आहे. तेव्हा वडिलांना मी सांगितलं की, मला सैन्यात भरती व्हायचं आहे, त्या शाळेत टाका. ते म्हणाले, शाळेत टाकण्याएवढे आपल्याकडे पैसे नाहीत. तू जामनगरला कसा जाणार, तुला कोण घेऊन जाणार आहे.
दरम्यान, अक्षय कुमारने दोन दिवसांपूर्वी एक ट्विट करुन खळबळ उडवून दिली होती. काहीतरी नवीन करतोय, असे म्हणत अक्षय कुमारे राजकीय प्रवेशाकडे लक्ष वेधलं होतं. मात्र, त्यानंतर अक्षयनेच मी राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे म्हटले. तर, आज सकाळी पंतप्रधान मोदींची मुलाखत घेऊन सर्वांनाचा आश्चर्याच धक्का दिला आहे.