...तर मोदींविरोधात खुनाचे गुन्हे दाखल करेन; नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 02:43 PM2019-03-28T14:43:28+5:302019-03-28T14:55:56+5:30
नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते जावेद अहमद राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे.
श्रीनगर - लोकसभा 2019 ची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तस तशी राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते जावेद अहमद राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. 'मला शक्य झाले तर मी मोदींना जम्मू-काश्मीरमधील तरुणांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात टाकेन' असं राणा यांनी म्हटलं आहे.
जावेद अहमद राणा यांनी 'अल्लाहची शपथ घेऊन सांगतो की जर मला शक्य असतं तर मी देशाच्या पंतप्रधानांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असता. जम्मू-काश्मीरमध्ये जितक्या हत्या झाल्या, त्या प्रकरणी आणि देशात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मी मोदींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकेन' असं म्हटलं आहे. बुधवारी (27 मार्च) पूँछ येथे जावेद अहमद राणा यांनी स्थानिकांशी संवाद साधत असताना असं वादग्रस्त विधान केलं आहे.
#WATCH National Conference leader, Javed Ahmed Rana, in Poonch: Khuda ki kasam, agar mera bas chale, to mai is desh ke pradhanmantri ke khilaf, jitne bhi qatl hue hain Jammu-Kashmir mein aur desh mein, mai isko qatl ke case mein andar thok dunga. (27.03.19) pic.twitter.com/o5wD5YDCzO
— ANI (@ANI) March 28, 2019
Lok Sabha elections 2019: 'मोदी मोदी' म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा; आमदाराचा बेताल आदेश
जनता दल संयुक्त(जेडीएस)चे आमदार शिवालिंग गौडा यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. कर्नाटकातील एका जनसभेला संबोधित करताना शिवालिंग गौडा म्हणाले, मोदी मोदीच्या घोषणा देणाऱ्यांच्या कानशिलात लगवा. मोदींनी जशी आश्वासन दिली होती, तसे कोणाच्या खात्यात आतापर्यंत 15 लाख आले आहेत काय?, जो कोणी भाजपा नेता प्रचारादरम्यान तुमच्याजवळ येईल त्याला पहिला प्रश्न हा विचारा.गेल्या निवडणुकीत मोठी आश्वासने मोदींनी दिली होती. मात्र त्यातील एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. भाजपावर जोरदार टीका करताना शिवालिंग गौडा यांची जीभ घसरली होती.
'मिशन शक्ती'ची मोदींकडून घोषणा म्हणजे निव्वळ नाटक'
भारताने मिसाइलच्या साहाय्याने उपग्रह पाडला असून मिसाइलच्या साहाय्याने उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. वैज्ञानिकांनी अंतरिक्षात 300 किमी दूर लो अर्थ ऑरबिट लाइव्ह सॅटेलाइटला पाडल्याची घोषणा बुधवारी (27 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानंतर विरोधकांकडून मोदींवर टीका करण्यात येत असून मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. मोदींनी केलेली घोषणा निव्वळ नाटक असल्याचे म्हटले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मोदींवर हल्लाबोल करताना ट्विट केले की, भारताचा मिशन शक्ती कार्यक्रम अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. आपले शास्त्रज्ञ, डीआरडीओ आणि इस्रोचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्याकडून या संदर्भात करण्यात आलेली घोषणा म्हणजे निव्वळ नाटक आहे. मोदींकडून निवडणुकीच्या काळात राजकीय फायदा घेण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. आदर्श आचारसंहितेचा हा भंग आहे. आपला कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वी या मिशनची घोषणा करण्याची आवश्यकता नव्हती, असंही ममता यांनी म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विट करून मिशन शक्तीमधील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. यावेळी राहुल यांनी मोदींना जागतीक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत टोला लगावला आहे.