No Confidence Motion : अविश्वास ठरावावर शिवसेनेचं अद्यापही तळ्यात-मळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 06:33 AM2018-07-20T06:33:31+5:302018-07-20T06:38:51+5:30
शिवसेना अविश्वास ठरावाच्या बाजूनंही मतदान करू शकते, अशीही अटकळ बांधली जात आहे.
मुंबई- मोदी सरकारविरोधात तेलुगू देसम पक्षाबरोबर मिळून काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करणार असल्याची चर्चा असतानाच शिवसेना अविश्वास ठरावाच्या बाजूनंही मतदान करू शकते, अशीही अटकळ बांधली जात आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या खासदारांना दिल्लीत उपस्थित राहण्यास बजावलं आहे. मोदी सरकारविरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अंतिम भूमिका स्पष्ट करणार आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या पदाधिका-यांनी दिली आहे. तत्पूर्वी व्हीप बजावत शिवसेनेच्या खासदारांना एनडीए सरकारच्या बाजूनं मतदान करण्यास सांगण्यात आलं होतं.
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय हर्षल प्रधान म्हणाले, उद्धव ठाकरेंनी सर्व खासदारांना दिल्लीत उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. तसेच पक्षाची भूमिका शुक्रवारी सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः स्पष्ट करतील. शिवसेनेचे लोकसभेतील खासदार चंद्रकांत खैरेंनीही व्हीपच्या मुद्द्यावर खुलासा केला आहे. व्हीप(नोटीस)मध्ये पक्षाच्या खासदारांना दिवसभर संसदेत उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.
Chandrakant Khaire, Shiv Sena Chief whip in Lok Sabha to ANI says that there was no whip issued to vote one way or another. Notice has been given to be present in Parliament. Party chief Uddhav Thackeray will take final decision. #NoConfidenceMotionpic.twitter.com/ozDr0EtLlT
— ANI (@ANI) July 19, 2018
कोण बाजूने, कोण विरोधात?
ठरावाला अण्णा द्रमुक हा पक्ष पाठिंबा देणार नाही, तर तेलंगणा राष्ट्र समिती आणि शिवसेना या ठरावाला पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. बिजू जनता दलाने आपली भूमिका आज जाहीर करण्याचे ठरविले आहे. हे दोन्ही पक्ष कदाचित मतदानात भागच घेणार नाहीत, असे सांगण्यात येते आहे.