गोरखपूरमधील बीआरडी इस्पितळ नव्हे, ‘मृत्यू’तळच! आॅगस्टमध्ये २९६ बालके दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 02:29 AM2017-08-31T02:29:04+5:302017-08-31T02:31:16+5:30
बालकांच्या मृत्यूंमुळे देशभरात कुख्यातीने चर्चेत आलेल्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात आॅगस्ट महिन्यात एकूण २९६ बालकांचा मृत्यू झाला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य पी.के. सिंह यांनी दिली.
गोरखपूर (उत्तर प्रदेश) : बालकांच्या मृत्यूंमुळे देशभरात कुख्यातीने चर्चेत आलेल्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात आॅगस्ट महिन्यात एकूण २९६ बालकांचा मृत्यू झाला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य पी.के. सिंह यांनी दिली.
मेंदुज्वर रुग्ण कक्षात ८३ आणि नवजात शिशू कक्षातील २१३ बालकांचा मृतांमध्ये समावेश आहे. याच इस्पितळात मेंदुज्वर, नवजात शिशू आणि बालरुग्ण कक्षात यावर्षी जानेवारीपासून १,२५^^६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहितीही सिंह यांनी दिली.
गंभीर आजारी असलेल्या मुलांना नवजात शिशू अति दक्षता कक्षात उपचारासाठी आणले जाते. यात मुदतपूर्वी जन्मलेली, कमी वजनाची, कावीळ आणि अन्य संसर्गजन्य आजारी असलेल्या बालकांचा समावेश असतो. मेंदुज्वर झालेल्या बालकांना तर अत्यंत गंभीर स्थितीत ऐनवेळी आणले जाते. अशा मुलांना उपचारासाठी वेळीच इस्पितळात आणल्यास नवजात बालकांना वाचविणे शक्य असते, असे प्राचार्य सिंह यांनी म्हटले आहे.गेल्या २४ तासांत मेंदू ज्वराचे १७ बालकांना या इस्पितळात दाखल करण्यात आले असून उपचारादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला, असे अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. पुष्कर आनंद यांनी सांगितले.
दरम्यान, बीआरडी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजीव मिश्रा आणि त्यांच्या पत्नीला उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
२०१७ मध्ये १,२५६ जणांचा मृत्यू
आॅगस्ट २०१७ मध्ये कोणत्या रुग्ण कक्षात किती बालके दगावली, याचा तपशीलही त्यांनी दिला. २७ आणि २८ आॅगस्ट रोजी ३७ बालकांचा मृत्यू झाला. यापैकी २६ बालक नवजात शिशू आयसीयूत आणि ११ मुले मेंदुज्वर उपचार कक्षात मरण पावली.
गोरखपूरच्या या इस्पितळात सातत्याने बालकांचा मृृत्यू होत असल्याप्रकरणी काँग्रेसने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागितला आहे. न्यू इंडियात मानवी जीवाला किंमत नाही. भाजपशासित राजस्थान, हरियाणा, झारखंड, छत्तीसगडमध्येही मृत्यूचे तांडव चालू आहे. दोषींना अभय दिले जात आहे, अशा शब्दांत राज बब्बर यांनी निशाणा साधला.