आता टोमॅटो करा बँकेत डिपॉझिट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 08:40 AM2017-08-03T08:40:19+5:302017-08-03T08:44:02+5:30
टोमॅटोच्या वाढलेल्या या किंमतीचा काँग्रेस पक्षाकडून निषेध केला जात असून त्यासाठी लखनऊ काँग्रेसने खास युक्ती शोधून काढली आहे.
लखनऊ, दि. 3- गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या दराचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागतो आहे. इतकंच नाही, तर टॉमेटो विकत घेणं परवडत नसल्याने अनेकांनी आहारातूनही टोमॅटो वगळल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. बाजारात टोमॅटोची आवक घटल्याने तसंच वाढलेल्या टोमॅटोच्या दरांमुळे अनेक ठिकाणी टोमॅटोचे ट्रक चोरीला गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. टोमॅटोच्या वाढलेल्या या किंमतीचा काँग्रेस पक्षाकडून निषेध केला जात असून त्यासाठी लखनऊ काँग्रेसने खास युक्ती शोधून काढली आहे. सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांच्या मालाला संरक्षण देण्यासाठी लखनऊ काँग्रेसने 'टोमॅटो बँक' सुरू केली आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत लखनऊ काँग्रेसने शहरात 'स्टेट बँक ऑफ टोमॅटो' ही बँक सुरू केली आहे. एखाद्या बँकेमध्ये जशा सुविधा मिळतात तशाच सुविधा या बँकेतही ग्राहकांना मिळणार आहेत. फक्त या बँकेत कोणतीही गोष्ट टोमॅटोशी निगडीत असावी लागणार आहे. या बँकेत ग्राहकांना टोमॅटोवर फिक्स डीपॉझिट करता येणार आहे तसंच लॉकर आणि कर्जसुद्धा टोमॅटोवर मिळणार आहे. काँग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या या बँकेला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बँकेच्या बाहेर लोकांच्या लांब रांगा लावल्या आहेत. घरातून टोमॅटो चोरीला जातील या भीतीने लोक त्यांच्या टोमॅटो बँकेत डिपॉझिट करण्यासाठी येत आहेत. या रांगेमध्ये एक 103 वर्षांचा वृद्ध व्यक्तीही होता. टोमॅटो बँकेत डिपॉझिट करावे लागण्याची वेळ येऊ शकते असं कधीही वाटलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. मी अर्धा किलो टोमॅटो आता बँकेत डिपॉझिट केले आहेत. बँकेच्या नियमानुसार मला सहा महिन्यांनी एक किलो टोमॅटो मिळणार आहेत, असं त्या वृद्ध व्यक्तीने सांगितलं.
लखनऊ काँग्रेसच्या सदस्यांकडून ही बँक चालविली जाते आहे. या बँकेला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. जर असाच प्रतिसाद राहिला तर आम्हाला अजून शाखा उघडाव्या लागतील, असं मत त्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे.
देशाच्या अनेक भागात टोमॅटो 100 ते 120 रूपये किलो दराने विकले जात आहेत. सप्टेंबर महिन्यापर्यंत टोमॅटोचे दर असेच वाढलेले राहतील असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
या आहेत टोमॅटो बँकेच्या योजना
- बँकेत टोमॅटो डिपॉझिट केल्यास सहा महिन्यांनी पाच पट टोमॅटो मिळणार.
- टोमॅटो ठेवण्यासाठी बँकेत लॉकर सुविधा उपलब्ध.
- टोमॅटोवर 80 टक्के कर्ज मिळणार.
- गरिबांनी बँकेत टोमॅटो जमा केल्यास त्यांना आकर्षक व्याज दर मिळणार.