आमचे उत्तर भारताच्या पुढच्या पिढया लक्षात ठेवतील - पाक एअरफोर्स प्रमुख
By admin | Published: May 24, 2017 02:55 PM2017-05-24T14:55:43+5:302017-05-24T14:55:43+5:30
सोहेल अमन यांनी स्कार्डू येथील कादरी हवाई तळाला भेट दिली. तिथे पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचा युद्ध सराव सुरु आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 24 - भारताने जास्त आक्रमकता दाखवू नये अन्यथा भारताच्या पुढच्या पिढया लक्षात ठेवतील असे उत्तर देऊ असा धमकीवजा इशारा पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रमुख सोहेल अमन यांनी दिला आहे. सोहेल अमन यांनी स्कार्डू येथील कादरी हवाई तळाला भेट दिली. तिथे पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचा युद्ध सराव सुरु आहे.
पाकिस्तानने भारताच्या सीमारेषेला लागून असलेले सर्व हवाई तळ कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. सोहेल अमन यांनी स्वत: सुद्धा मिराज विमान चालवले. त्यांनी भारताच्या सियाचीन-ग्लेशिअरमधून हे विमान नेल्याने वाद निर्माण झाला आहे. हवाई तळावर पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना सोहेल म्हणाले की, पाकिस्तानी हवाई दल कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी.एस.धानोआ यांनी हवाई दलाच्या 12 हजार जवानांना लिहीलेल्या पत्रामध्ये सज्ज राहण्याचे निर्देश दिले होते तसेच भारतीय सैन्यदलाने मंगळवारी सीमारेषेवरील पाकिस्तानी चौक्या नष्ट केल्याचा व्हिडीओ सार्वजनिक केल्यानंतर पाकिस्तानात अस्वस्थतता निर्माण झाली आहे. सर्वच बाजूंनी भारतासमोर नाचक्की झाल्याने पाकिस्तानात अस्वस्थतता असून, जळफळाट झाल्याने पाकिस्तानकडून अशी आक्रमकतेची भाषा केली जात आहे.
दरम्यान सियाचीन ग्लेशिअर भागातून पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी उड्डाण केल्याचा पाकिस्तानी माध्यमांचा दावा भारतीय हवाई दलाने फेटाळून लावला आहे. हवाई हद्दीचे कुठलेही उल्लंघन झाले नसल्याचे भारतीय हवाई दलाने म्हटले आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रमुख मार्शल सोहेल अमन यांनी स्कार्डू भागातील कादरी एअरबेसला भेट दिली.
यावेळी सोहेल अमन यांनी "मिराज" हे लढाऊ विमान स्वत: चालवताना सियाचीन-ग्लेशिअर भागातून नेले असे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले होते. जर असे घडले असेल तर ते हवाई हद्दीच्या नियमांचे उल्लंघन आहे. भारतीय वायू दलाने लगेचच पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला आहे.