घाणेरडे राजकारण; अभिनंदन यांना पाकिस्तान आर्मीचे गुणगान करायला भाग पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 01:09 AM2019-03-02T01:09:45+5:302019-03-02T06:16:50+5:30
लढाऊ विमान कोसळल्याने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांना दिवसभराच्या विलंबानंतर भारताच्या ताब्यात देण्यात आले.
नवी दिल्ली : लढाऊ विमान कोसळल्याने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांना दिवसभराच्या विलंबानंतर भारताच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, यावेळीही पाकिस्तानने घाणेरडे राजकारण केले असून सोडण्याआधी त्यांच्याकडून पाकिस्तानचे गुणगान करायला भाग पाडले आहे. तसेच भारतीय प्रसारमाध्यमे कशी अफवा पसरवतात त्यावरही भाष्य करायला लावले आहे. पाकिस्तानने 1.24 मिनिटांचा हा व्हिडिओ सुटकेआधी स्थानिक प्रसारमाध्यमांना दिला असून यामध्ये तब्बल 17 कट देण्यात आले आहेत.
भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकने बुधवारी (27 फेब्रुवारीला) सकाळी भारतात घुसखोरी केली होती. पाकच्या विमानांना पिटाळून लावताना मिग-21चे विंग कमांडर पाकच्या हद्दीत शिरले होते. तेथे त्यांचे विमान पाडण्यात आले. पण त्यांनी लगेच पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. मात्र स्थानिकांनी त्यांना पोलिसांच्या व नंतर लष्कराच्या ताब्यात दिले. त्यांच्या सुटकेची आग्रही मागणी भारताने केली होती. त्यानंतर पाकिस्ताननं अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सुपूर्द केलं आहे.
मात्र, यापूर्वी पाकिस्तानने दोनवेळा त्यांच्या सुटकेची वेळ पुढे ढकलली. या वेळी पाकिस्तानने अभिनंदन यांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून त्यांना गेल्या 3 दिवसांमधील घटनाक्रम सांगण्यास भाग पाडले आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तान हवाई हद्दीमध्ये मी लक्ष्य शोधण्याचा प्रयत्नात आलो होतो. पाकच्या विमानांनी माझे विमान पाडले. पॅरॅशूटच्या साह्याने खाली आलो. माझ्याकडे पिस्तूल होते. खूप लोक जमले होते. मी बचावासाठी पिस्तूल टाकले आणि पळू लागलो. त्यांचा जोश मोठा होता. तेव्हा दोन पाकिस्तानी जवान आले. त्यांनी वाचविले. पाकिस्तानी आर्मीचे कॅप्टनही होते. त्यांनी मला आणखी काही होऊ दिले नाही. त्यानंतर युनिटपर्यंत नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार केले. हॉस्पिटलमध्येही नेऊन उपचार केल्याचे म्हणताना दाखविण्यात आले आहे.
पाकिस्तान यावर थांबले नसून पाकिस्तानी आर्मी एक अत्यंत व्यावसायीक संस्था आहे. शांततेची प्रतिक आहे. त्यांच्यासोबत चांगला वेळ घालविला. भारतीय मिडीया छोट्या छोट्या गोष्टी वाढवून सांगते. यामध्ये तिखट मसाला लावला जातो. आणि लोकांना भडकावले जाते, असेही त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले आहे.
1.24 मिनिटांच्या व्हिडिओत तब्बल 17 कट
अभिनंदन यांच्या सुटकेपूर्वी रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये तब्बल 17 कट देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे लोकांमध्ये जोश जास्त होता, हे सांगताना ते अडखळले आणि दुसरीकडे पाहून बोलले, हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. याचा अर्थ त्यांच्यासमोर स्क्रीप्ट ठेवण्यात आली होती व त्यांच्याकडून पाकिस्तानचे गुणगाण आणि भारतीय मिडीयाविरोधात वदवून घेण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
फेक ट्विटर अकाऊंटही उघडले
पाकिस्तानने भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांचे खोटे ट्विटर अकाऊंटही उघडले असून त्यांची ही वक्तव्ये ट्विट केली आहेत. हे अकाऊंट 28 फेब्रुवारीला उघडण्यात आले असून पाकिस्तानी आर्मीने वायफाय फ्रीमध्ये दिले आहे. भारतात परत जाण्याचे मन करत नाहीय, असे पहिले ट्विटही केले आहे.
Pakistan army is so nice that they shared their Wifi password with me and even let me made a twitter account, can't I just stay here and enjoy my life, I don't even wanna go back home #PakistanZindabad
— Abhinandan Varthaman (@IAFAbhinandan) February 28, 2019