पाकिस्तानकडून ठाणी, खेड्यांवर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 05:44 AM2019-03-07T05:44:14+5:302019-03-07T05:44:22+5:30
पाकिस्तानच्या लष्कराने बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांत नियंत्रण रेषेवरील डझनभर ठाणी आणि खेड्यांवर तोफांचा मारा केला.
जम्मू : पाकिस्तानच्या लष्कराने बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांत नियंत्रण रेषेवरील डझनभर ठाणी आणि खेड्यांवर तोफांचा मारा केला. संपूर्ण रात्रभर सुंदरबनी (राजौरी जिल्हा) सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार आणि तोफमारा सुरू होता तर बुधवारी पहाटे कृष्णा घाटी (जिल्हा पूंछ) सेक्टरमध्ये तो सुरू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
या माऱ्याला भारतीय लष्करानेही चोख प्रतिउत्तर दिले व दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू राहिल्यामुळे सीमेवर राहणाऱ्यांच्या मनात घबराट निर्माण झाली. भारतीय बाजूकडे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तानने मंगळवारीही नौशेरा आणि सुंदरबनी आणि कृष्णा घाटीत गोळीबार केला होता. नौशेरा सेक्टरमध्ये दोन्ही बाजुंकडून गोळीबार तीन तास सुरू राहिला त्यात एक जवान जखमी झाला. कृष्णा घाटीत गोळीबार सकाळी सहा ते रात्री ८.१५ पर्यंत सुरू होता. सुंदरबनी सेक्टरमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजता गोळीबार सुरू होऊन बुधवारी पहाटे साडेचारला थांबला.
६0 वेळा केला गोळीबार
गेल्या आठवड्यात राजौरी आणि पूंछमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सुमारे ६० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन होऊन एका कुटुंबातील तीन जणांसह चार नागरिक ठार तर अनेक जण जखमी झाले, असे हा अधिकारी म्हणाला.